कलई वाला😀👍🏼
कलई वाला😀👍🏻
पूर्वी पितळी भांड्यांचा जास्त वापर होता. त्यामुळे ते स्वच्छ ठेवण्याकरता भांड्यांना आतून कलई करावी लागायची. कलई केली नाही तर त्या भांड्यातले पदार्थ शिजवल्यानंतर खराब होत. कलई करण्याकरता ठराविक कारागीर होते.
आम्ही लहान असताना आमच्या गल्लीत एक कलईवाले काका यायचे. त्यांना आधी आमचे काका सांगायला जायचे की पुढच्या आठवड्यात या ! कलई ही स्वयंपाक घरातील पितळी भांड्यांना केली जायची. जसे की परात, वाट्या, ग्लास, पळी, इ. मोठमोठ्या पातेल्यांना - ज्यात कुरडई , बिबड्याचा घाटा, खारोड्या, इ., केल्या जायच्या त्यांनाही कलई केली जायची. ज्या भांड्यांना कलई करायची ते भांडे आधी राखेने स्वच्छ घासून ठेवावे लागायचे कारण तेलकट भांड्यांवर कलई बरोबर होत नसे. ते काका खाली रस्त्याच्या एका बाजूला खड्डा करायचे आणि एक लाकडी कोळशाची भट्टी लावायचे. त्याला हवा भरण्यासाठी एक छोटा पंखा पण असायचा. मग 1 भांडे घ्यायचे व ते त्या भट्टीवरती चांगले लाल होईस्तोवर तापवायचे. ते तापले की त्याच्यावर कथिलाचा थेंब टाकायचा. कथिल एक धातू आहे. तो गरम भांड्यात वितळतो. त्यात सवागी टाकून कापसाने किंवा जुन्या कपड्यांच्या फडक्याने पॉलिश करत. त्याची गंमत म्हणजे ते काका त्यावर एक आकडा लिहायचे. मग लहान मुलं तो आकडा कोणता आहे म्हणून ओळखायला पैज लावायची.प्रत्येक जण म्हणायचे हा आकडा टाका कोणी पाच म्हणायचं तर कोणी दहा म्हणायचं. ते बघण्यात पण खूप मज्जा यायची. नंतर ते भांडे गार पाण्यामध्ये बुडवायचे. त्याचा चर्रर्र असा आवाज यायचा मग ते भांडे वापरायच्या आधी स्वच्छ घासून धुऊन घ्यावे लागायचे. भांड्यांना कलई केल्यावर ते पांढरेशुभ्र चांदी सारखे चमकायचे ! अगदी चांदीच्या भांड्यात जेवल्याचे समाधान करून द्यायचे.
त्या भांड्यांची पॉलिश पुर्ण निघाली की मग परत त्या काकांना बोलवायचे. भांड्यांना कलई करवून घेणे हे घरोघरी खूप मोठे काम असायचे. आता पितळी भांडी कोणी वापरत च नाही त्यामुळे "कलई" हा शब्द इतिहास जमा झाला आहे.
Very nice. Amarnath Jangale
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDelete