बाळाचे बारसे 🎉
'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -
बाळाचे बारसे 🤱🐾
बाळ 12 दिवसाचे झाले किंवा सव्वा महिन्याचे झाले की आपण त्याचे नाव ठेवतो. कोणी पाच नाव ही ठेवतात. हा सोहळा खूप आनंदाचा असतो. त्याआधी पाचव्या दिवशी बाळाची पाचवी करतात. त्या दिवशी बाळाची भाग्यरेषा लिहिली जाते. बाराव्या दिवशी नाव ठेवतात म्हणून त्याला बारसे म्हणतात. त्याचे मूळ नक्षत्र असेल तर शांती करावी लागते. ती सुद्धा बाराव्या दिवशी किंवा सव्वा महिन्यानंतर करतात. बाळाचे कोणत्या अक्षरावरून नाव निघाले हे ब्राम्हणाला विचारतात. मग त्याची चर्चा, त्या अक्षराचे नाव प्रत्येक जण आपआपल्या आवडीचे सुचवतो. आता तर गूगल वर मुलांच्या आणि मुलींच्या नावांची ए टू झेड अक्षरा पर्यंत लिस्टच मिळते. पूर्वी घरातील वडीलधारी माणसं जे ठरवतील ते नाव ठेवून द्यायचे. आता तसे नाही.
पाळण्यात बाळाच्या कानामध्ये कुर् असा आवाज करून नाव बोलण्याचा पहिला मान आत्याचा असतो. आत्या कानात नाव बोलते तेव्हा चेष्टेने पाठीत हाताने बुक्के मारतात. त्या दिवशी ब्राह्मण तांदळावर बाळाचे नाव लिहितो व काही शांती पाठ करतात. मग संध्याकाळी पाळण्यात टाकतात. आजकाल सगळ्यांच्या सोईसाठी बारसे हॉलमध्ये करतात. कोणी जेवण ठेवतो, कोणी नाश्ता ठेवतो. बारशाचा पाळणा खेळणी, फुलांनी छान सजवतात. बाळंतविडा असतो. तो रुखवंता सारखा काही ठराविक पद्धतीने मांडतात. पाळण्यात पहिला मान पाटावरच्या वरवंट्याचा असतो. त्याला नवीन कपडे, दागिने घालतात. मग ह्या वरवंट्याला आधी पाळण्याच्या एका बाजूने खालून दुसर्या बाजूस वर देऊन सहदेव घ्या - महादेव घ्या असे देवाची पाच नावे घेत पाच वेळा करतात आणि मग पाळण्यामध्ये टाकतात. त्यानंतर बाळाला ही अशाच प्रकारे पाळण्यात टाकतात.
बाळाला सुंदर नवीन कपडे🎽, अंगावर बाळ लेणी (चेन, ब्रेसलेट, साखळ्या, इ.), दृष्ट लागू नये म्हणून तीट लावून छान सजवतात. पाच विड्याच्या पानांवर साखर फुटाणे ठेवतात. रामाचा कृष्णाचा पाळणा म्हणतात. आजकाल बारशाची गाणी म्हणणारी मंडळं आहेत. त्यांना बोलावून सुद्धा वेगवेगळी गाणी म्हणतात. सासरचे - माहेरचे ओटी भरतात. आईला पाळण्याला पाठीने झोका द्यायला सांगतात. त्याचे गुपित म्हणजे तिचा पुढचा पाळणा उशिरा हल्ला पाहिजे असे. मग गुळ - फुटाणे, गव्हाच्या घुगऱ्या वाटतात. मुलगा असेल तर पेढे, मुलगी असेल तर बर्फी वाटतात. पण आता तसं काही राहिलं नाही. सर्व सासर - माहेरच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण देतात.
असे प्रत्येक बालकावर जन्मल्यापासून सोळा संस्कार होतात. नंतर ते बाळ वर्षाचे झाले की वाढदिवस साजरा होतो.👣🎂
🖋 सुलहर
Very nice. Amarnath Jangale.
ReplyDelete