"पोळीचा कुस्करा"

'सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -

                  "पोळीचा कुस्करा"

"अगं आई आज नाश्ता काय? त्या दिवशीसारखाच नाश्ता कर बरं!" तितक्यात बाहेरुन आवाज आला मैत्रिणीचा 'अगं मी पण आलीये बरं खायला!' तर आई म्हणाली, 'नाही ग ! तू खूप दिवसांनी आलीस. दुसरे करते काहीतरी.' ती म्हणाली, "नाही काकू, तुमच्या हातचा कुस्करा खाण्याचा चान्स नाही सोडणार मी. यापुढे पोहे, सांजा सुद्धा फीके आहे. काही नाही मी तेच खाणार!" आईनी मैत्रिणीसाठी दुसरे काहीतरी नाश्त्यासाठी बनवायचे म्हटले, पण मैत्रीण अडून बसली म्हणाली "दिवाळीचा फराळ खाऊन खूप कंटाळा आला आहे. वेगळं काहीतरी खावे असे वाटते, म्हणुन आता हेच खाणार". हो नाही करता करता शेवटी ऐकावे लागले तिचे आणि आईनी सर्वांसाठी गरमागरम कुस्करा केला. सर्वांनी चवीने व पोटभर खाल्ला. 

मग गप्पा सुरु झाल्या. मैत्रिणीने विचारले की कसा केला काकू कुस्करा ? "काही नाही ग, शिळ्या पोळीचा हाताने बारीक चूरमा करून घेतला. कांदा, कोथिंबीर , दाणे तयारी करून ठेवली. कढई तापत ठेवली. त्यात तेल, मोहरी, जिरे, मग बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला लाल होऊ द्यायचा. तिखट ,मीठ ,हळद टाकायचे. त्याला झाकण ठेवून थोडा पाण्याचा सबका मारायचा. चवीला थोडी साखर टाकायची. परतल्यानंतर वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे मऊ होतो. आणि मग गरम गरम खायला द्यायचा.

एक गंमत सांगते परवा माझ्या मावस बहिणीचा फोन आला की मी भेटायला येणार आहे. तिने फोन वर आधीच सांगितले, "मावशी मी तुझ्या हातचा कूचकरा खाणार आहे. कारण काय तर आमच्याकडे मोजके दोन माणसं त्यामुळे पोळ्या उरत नाही. आमच्याकडे पोळीवाली आहे ती मोजून पोळ्या करते. इच्छा असली तरी पोळ्या उरतच नाही !"

मैत्रिणींनो तुम्हाला माहित आहे का हा पदार्थ किती नावाने आणि किती प्रकारचा केला जातो? प्रत्येक कृती वेगळी आणि चव सुद्धा वेगळी. आवडीनुसार झटपट टेस्टी करता येतो. कोणी फोडणीची पोळी म्हणतात, कोणी मनोहरा म्हणतात, कोणी काला म्हणतात, कोणी चुरमा म्हणतात, कोणी फोडणीचे तुकडे पणं म्हणतात. अशा वेगवेगळया  नावाने ओळखला जातो. थोडक्यात कृती अशी आहे -

1) फोडणीची पोळी (1):- पहिले पोळीचा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. गॅसवर कढई ठेवून त्याला तेलाची फोडणी द्यायची. तिखट ,मीठ, हळद ,मोहरी ,जिरे ,हिंग, लसूण टाकायचा. मग त्यात थोडी मुगाची डाळ टाकायची पाण्याला उकळी आली की पोळीचे चौकोनी तुकडे करून त्यात टाकायचे आणि आणि छान  वरून कोथिंबीर टाकायची. खाताना साजूक तूप टाकून खायचा गरम गरम काय छान चव लागते.

2) फोडणीची पोळी (2):- कोणी कोणी पूर्वी ह्या पोळ्या टोपलीत टाकून छान कडक वाळवायचे. रोज उरलेल्या पोळ्या वाळवायच्या. मग दोन चार दिवसांनी किंवा ज्या दिवशी नाश्त्याला काही नाही त्या दिवशी त्या पोळ्या काढायच्या व छोटे छोटे तुकडे करायचे व नंतर गॅसवर कढई ठेवून तेल टाकून पाण्याला फोडणी द्यायची लसुन भरपूर घालायचा. पाणी उकळत आले की त्यात तुकडे टाकायचे आणि शिजवायचे. ताजी डाळफळ तरी काय लागतील, त्यापेक्षाही स्वादिष्ट होतात !

पूर्वी घरोघरी करत असे कारण तेव्हा काही बाहेरचा नाश्ता नव्हता. कधी रात्री जेवायच्या वेळेस भाजी नसायची, वेळेवर काय करणार ? घरात भरपूर मोठे कुटुंब असायचे मग आपल्यासाठी असे काही वेगळे काय करायचे ? म्हणुन कधी कधी काही नसले की ज्वारीचे, बाजरीचे पीठ घेऊन त्यात तिखट मीठ टाकायचे आणि चालू तव्यावर मुटकुळे लावायचे. अशाप्रकारे मग नवीन नवीन प्रकार शोधून काढले गेले. 

 3) वरण पोळीचा चुरमा :- गरम गरम वरण उकळत ठेवायचे आणि त्याच्यामध्ये बारीक चुरमा टाकायचा आणि छान मऊ झाला की त्यात भरपूर तूप घालून गरम गरम खायचे. अप्रतिम लागते. कोणी कोणी ताटात पोळी मोडून वरून गरम गरम वरण घेऊन तूप टाकतात. त्याला वरणाचा काला म्हणतात. त्याच्या सोबत तोंडी लावायला लोणचं/लोणच्याचा खार. लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा वरण पोळी असते. सगळे आवडीने खातात. बारीक चूरमा करून आळ करायचं आणि त्यामध्ये वरून पातळ वरण टाकायचे अशी खाण्याची पद्धत आहे. लग्नातली वरण पोळी तर विचारूच नका जास्त करून लेवा पाटील लोकांमध्ये हा बेत असतो. आता बट्टया, बाफले करतात. पूर्वी पोळ्या करायचे. त्याच्या सोबत घोटलेली वांग्याची भाजी नाहीतर गंगा फळाची भाजी असा बेत असतो.

4)आता गोडा चे प्रकार :- पोळीचा बारीक चूरमा करून घ्यायचा त्यामध्ये गूळ तूप टाकायचे आणि लाडू बांधायचे. लहान मुलांना पूर्वी हेच लाडू द्यायचे शाळेच्या डब्यात. अशा प्रकारचे चविष्ट, पौष्टिक पदार्थ डब्यात किंवा नाश्त्याला. बट्टीचा पण असाच चूरमा करता. बट्टी आधी छान बारीक करून घ्यायची मग त्याच्यात गूळ तूप टाकायचं.

5) गोडाचा एक वेगळाच प्रकार ही आहे. पोळी बारीक करून घेतली की गॅसवर कढई ठेवून त्यात पहिले साजूक तूप टाकायचे. गुळ बारीक करून त्यात टाकायचा. तो पातळ झाल्यानंतर त्यानंतर चुरमा टाकायचा. थोडे झाकून ठेवायचे काय सुंदर स्वादिष्ट लागतो म्हणून सांगू! आपली जिलबीची टेस्टी स्वीट डिश तयार !

जेव्हा भूक लागते तेव्हा असे तिखट - गोड चूरम्याचे प्रकार झटपट भुक शमवते. 

हे सर्व आईने माझ्या मैत्रिणीला सांगितले तर ती थक्क झाली व म्हणाली "बापरे ! चूरम्याबद्दल इतकी छान माहिती सांगितली तुम्ही मला. मी पण आता हे सर्व करून बघणार ". सर्व चूरमापुराण चूरमा खाता-खाता संपवल. तसे सगळे हसले. पूर्वी हे पदार्थ सर्रास व्हायचे. पण आता पोळीवाली असते सगळ्यांकडे ,मोजून करतात पोळ्या , सर्व अधिक मुलींना पोळ्या लाटायचा कंटाळा असतो आणि आता नोकरीमुळे वेळ नसतो . म्हणून पोळीवाली असते घरोघरी ,त्यामुळे याचे अस्तित्व कमी झाले सगळीकडे. त्याची सर कुठल्याच नाश्त्याला नाही. 

ज्याप्रमाणे श्रीमंताच्या काजूची बरोबरी शेंगदाणे असतात, त्याचप्रमाणे गरीबाचा श्रीमंती नाश्ता कुस्करा हा आहे.😀👍🏼

🖋 सुलहर

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"