सहर्ष स्वागत करत आहे
"विचारमंथन"
*एक आठवण*
माझी आई जेव्हा पोळ्या करायची तेव्हा मी फक्त बघत होते की ही कशी करते त्यामुळे मोठी झाल्यावर मला आपसूकच पोळ्या छान मऊ येऊ लागल्या.
शेवटी काय स्वयंपाक हा नजरेने शिकायचं असतो.
तसेच माझा लहान मुलगा मी स्वैपाक करताना नेहमी माझ्याजवळ उभा राहून पहात असे, मी स्वयंपाक कशी करते, ते त्यामुळे मी अभिमानाने सांगते की त्यालासुद्धा पोळीसकट सगळा स्वयंपाक येतो. तो लहान होता तेव्हाची एक गोष्ट आठवली.
मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा उलट करून मग गॅसवर भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच परत एका हातात पकड घेऊन तवा उचलला आणि फुलका चिमट्याने गॅसवर धरला तर तो लगेच टम्म फुगून आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला, "किती छान टम्म फुगला फुलका?
आई इतका सोप्पा असतो का?"😃
मी म्हणाले,
"हो, कठीण नसतोच मुळी फुलका व पोळी. खरंतर सगळा स्वैपाकच सोप्पा असतो. आम्हा बायांना कठिण नसतं ते... रोज रोज करणे दिवसातून दोन-तीन, अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा, आजारपणाचा, दुखण्याचा कशाकशाचा म्हणून विचार न करता अचूक आपली भूमिका निभावत असतो. भयंकर
'उकाड्यात'देखील शेगडीजवळ न कंटाळता, न थकता स्वयंपाक करत असतो. सगळे संपले असे वाटत असतानाच ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून चार पोळ्या जास्त कराव्या लागणे, स्वैपाकघर आवरून ठेवल्यावर 'संपली एकदाची दगदग आतापुरती तरी', असे वाटत असतानाच... बैठकीतून 'आज जेवूनच जा' चा पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह हसून साजरा करणे आणि तडक पगारी असो वा बिनपगारी ऑफिसला जाण्याची घाई असो overtime करणे आणि हे करीत असताना प्रत्येकाची भाजी तिखट, चटणीची वेगळी आवड आणि चव समजून त्यानुसार स्वयंपाक करणे
जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे. बरें एवढे करून भागेल तर कसले स्वैपाकघर? म्हणून सगळा पसारा इच्छा असो नसो, सर्व ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून पुन्हा लख्ख करून ठेवणे, दुसऱ्या वेळेसाठी. इतक्या मेहनतीला साधा कुणी thank you!🙏 चा उच्चार म्हणावा अशी अपेक्षा न करता!
समोरचा मात्र म्हणतो, 'ह्यात कोणते जग जिंकले स्त्रिया असतातच स्वैपाक आणि घरकाम करण्यासाठी! अशी सामाजिक मान्यता असणे..
आणि हे सगळे शिकल्या सवरल्या स्त्रिया आहेत म्हणून बँक, शाळा, नोकर्या, उद्योग, मीठ मसाला,
नातेवाईक, सण समारंभ इत्यादी व इतर अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळून फिरून ओट्याशी दोन हात करीत आहेत न कुरकुरता उभे राहणे. कामवाल्या बाईला निदान पगार तरी देतात, घरच्या बाईला तर तेवढीही किम्मत नसते. अरे ... फुलका कठीण नसतोच मुळी. कठीण असतो तो आम्हा बायकांचा स्त्री जन्म. असो!"
प्रत्येक स्त्रीची जन्म कहानी
देवा तूच बनवली, जन्मो जन्मी!
सुलहर
लीलाताई वानखेडे
Comments
Post a Comment