उसवण




सहर्ष स्वागत करत आहे 
"विचारमंथन",,
*उसवण /माया*


                      उसवण आणि माया या शब्दात  साम्य आहे उसवण ही कपड्याची करतात, त्याचप्रमाणे माया ही मुळातच आपल्या मनात असते.
आणि शिवलेल्या कपड्याच्या आत असते तीला पण माया म्हणतात.
त्याबद्दलचा अनुभव आणि वास्तविकता
चार पैसे आल्यावर मुलीचे बदलेले विचार आणि आईने काळजी पोटी सांगतानाचे विचार.
                  मुलगी आईला म्हणाली "आई! देऊन टाक, कुणाला द्यायच्या असतील तर या साड्या ,कुर्तीज  मला आता होत नाहीत...मी नवीन मागवतेय..."
"आई, अग इतक्या चांगल्या,भारी महागामोलाच्या... चारपाच वेळा तरी वापरल्यास का? लगेच कपडे   
टाकून काय गं देतात...? एखादी टीप उसवली तरी परत वापरता येतील की... म्हणूनच आत माया ठेवलेली असते ना...?"
"तुझ्यातली बाई लगेचच जागी झाली का..? 
"बोर झाल्या मला आता त्या कुर्तीज... मी नवीन बघते... " 
   लेकीचा निग्रह बघून ती उसासली. क्षणभर ही यांच्या जीवाची उलाघाल होत नाही का वस्तू टाकताना... रंग, पोत, डिझाईन, प्रसंग... कशात कशात म्हणून या पोरींचा हल्ली जीव अडकत नाही जरा. शाँप्स,माँल,अँप्स यांना सदा सर्वदा खरेदी ला प्राधान्य देत असतात.त्यामुळे पहिले घेतलेले कपडे लगेच आऊटडेटेडच होऊन जाता यांच्यासाठी! आपली पण ठिगळ लावण्याइतकी परिस्थिती कधीच नव्हती पण फेकून देण्याइतकी बेफिकिरीही आपल्या पिढीला माहीत नव्हती.
माया उसवून आपण कपड्यात सहज सामावले जात होतो. व मोठ्या बहीण-भावंडांचे लहान बहीण-भावंड कपडे उसवून घालतही होते.कारण त्या कपड्यावर व माणसावर आपली खूप माया होती तिथं मनात कमीपणाची भावना ही नसायचीच.
उसवताना एका धावत्या टिपेची सुरवातीची नाहीतर शेवटची एक दोनतीन टिपेची शिलाई (गाठ) उसवायला थोडी त्रासदायक ठरायची... पण एकदा का गाठ सुटली की... टीप हळूहळू सुईचे टोक लागता क्षणीच उकलून... मायेला वाट मोकळी करुन द्यायची... ते उसवणंही मग हळूवार होउन जायचं ना... धाग्याला ओढ ना कपड्याला फोड... फक्त बारीक छिद्रांची एक रेष कपड्यावर उमटून जायची... खुणेदाखल...! पण धुण्यात ती ही बुजुन जाई व ऊसवलेले दिसेनास होई.
मग हे चढत्या उतरत्या मापांना हे असं उसवणं... टिपेने सांधून घेणं अंगवळणी पडले. जगण्यातही खूपशा गोष्टींसाठी हे पुरक ठरले तसेच आपल्याला भेटणारी सगळीच नातीगोती. माणसे एका टिपेची कधीच नसतात तर आपल्यासोबत असतां ना... एखादा धागा कमीजास्त ओढावाच लागतो.
पुढे मग संसारात थोडसं व्यक्तिमत्व तिला, सासुबाईंच्या रुपात मिळालं होतं. बरंचस सोसंल तिने पण एकदा तोल गेलाच तिचा....  सासूबाईंच्या तेवढंच पथ्यावर पडलं... मी परत तुझ्या घराची पायरी चढणार नाही... तिला ठणकावून सांगतले त्यांनी घर सोडलं...तिच्यातली अशांतता तिला चैन पडून देईना... ती थोडी निवळल्यावर आई बाबांनी म्हणून तिला हळूच सांगितलं...थोडं स्वतःला उसवून बघ... आत भरपूर तुझ्यात माया आहे... मावून जातील त्या... फक्त अहंपणाची, गाठ सोडताना जरा जाणवेल आणि तिने स्वतःला उसवलं अगदी सासूबाईंच्या शेवटच्या श्वासांबरोबर बाजूबाजूने आपली माया मोकळी करत तिने गृहिणीचा धर्म निभावून नेला. उसवण्यातील मर्म तिला त्यांच्या शेवटच्या क्षणात समजले. अखंड तिच्या नावाचा जप करत त्यांनी निरोप घेतला.
म्हणून वाटतं उसवता आलं पाहिजे... सामावून घेण्याची ताकद आतल्या मायेने राखून ठेवलेलीच असते... एका ठराविक मर्यादेपर्यंत उसवता यावं...मग तो कपडा , विचार असो वा नातं असो...! जगणं खुपसं सोपं होऊन जाते. तसेच उसवणे आणि शिवणे जसे रोजच्या व्यवहारात सर्वांनाच काम पडतेच!
तसेच दोऱ्याचा किंवा लोकर गुणण्यात गाठ पडलेली हळुवारपणे सोडवावी लागते त्याला उशीर लागतो . दोरा तुटला आणि गाठ बांधली तर त्या  दोऱ्याने शिवण करता येत नाही. दोरा सुईतून पुढे जात नाही.
त्याचप्रमाणे नात्यामध्ये गाठ पडली तर दुसऱ्यांदा जोडायचे म्हणजे ह्या दोऱ्या प्रमाणे होते मग ते  कुठलं नात असो.
म्हणून जरी गुंता, गाठ पडली  तरी ते हळूवार सोडवावे.
जसं गीता रहस्य आहे जगण्यासाठी तसेच आपल्या जीवनातसुद्धा काही गोष्टी असे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जगण्यासाठी गरजेचे असतात.
असो या बद्दल प्रत्येकाचा विचार संग्रह वेग वेगळा असतो.


                               लीलाताई 
                                  सुलहर

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"