श्राद्ध पक्ष

सहर्ष स्वागत करत आहे 
"विचारमंथन",,

🌹 पितृ पक्षातील पंधरवाडा 🌹


             सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे या पंधरवड्यात प्रत्येकाच्या घरी आपल्या पीत्रांच्या तिथीला पीत्रांना पिंडदान करून श्रद्धेने श्राद्ध करण्याची(प्रथा)परंपरा आहे. या प्रथेला कुणाचाही विरोध नसावा व तसे काही कारणही नाही आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायलाच हवे असे आपण मानतो पण आजच्या धावपळी च्या युगात नवीन पिढीला हे करायला त्यांना वेळ पण नाही पण ज्यांनी हे लहानपणी बघितलेले आहे त्यांच्यावर संस्कार आहे ते मुलं जरूर करतात. असो. लिहिण्याचा कारण की आज एकादशी/द्वादशीचे आमच्याकडे श्राद्ध असते तर जुन्या आठवणी येऊन हे लिहावे असे वाटले. 
श्राद्ध म्हणजे गणपती उठल्यानंतर भाद्रपद पक्षातील पौर्णिमेपासून  अमावस्येपर्यंत  एक संस्काराचा पूर्वजांना जेऊ घालण्याचा आनंद सोहळाच असतो. आपल्या गावाकडे या दिवशी पित्र म्हणून एक जोडपे जेवायला बोलवतात जर आई असेल तर एका महिलेला आपल्या आईचा मान देऊन तिला आदराने जेवायला बोलवतात तसेच वडील असतील तर एक पुरुषाला त्यांच्या नावाने जेवायला बोलवतात. सध्याच्या परिस्थितीत शहरात कोणी कोणाकडे जात नाही म्हणून पुष्कळ जण आपला रोजचा स्वयंपाक करून घास काढून श्राद्ध जरूर करतात.

आमच्याकडे तर माझी आई होती तेव्हाची गोष्ट. या दिवशी २५ ते ३० लोकांना जेवायला बोलवणे असायचे. सर्वजण आवर्जून यायचे म्हणजे भुसावळला असताना, गावात तीन आत्या होत्या त्या सर्वांना व वाड्यातले सख्खे शेजारी, मित्रमंडळी असे सर्वांना आग्रहाने जेवायला बोलवायची. त्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाकाला लागायचो कारण दुपारी बारानंतर पितरांना जेवायला बसवले पाहिजे याचा स्वयंपाक पण खूप चौरस असून
सोहळ्यातच असायचा. आदल्या दिवशी पूर्वतयारी करून ठेवावी लागते. सकाळी एकदा का पाच, सहा वाजता उठून गॅसवर रांगोळी काढून गॅसची पूजा करून  स्वयंपाकाला उभे राहिले की सतत सहा, सात तास उभे राहून मग स्वयंपाक पूर्ण होत असे.
स्वयंपाकात जवळजवळ आठ- दहा प्रकारच्या भाज्या, पंचामृत, घारगे, पाटवड्या उडदाचे वडे, खीर हे खूप जरुरी असते. नंतर भजे, कुरडया, पापड, पुरी, फ्रुट्स, कोशिंबीर, वरण-भात, पोळ्या अजून इतर काही प्रत्येक भाज्यांमध्ये थोडे थोडे आले किसून टाकले जायचे. या दिवशीचा स्वयंपाक खूप टेस्टी व्हायचा. भुसावळला केळीची पाने खूप छान मिळतात. त्या पानावर हा संपूर्ण वाढलेला (प्रसाद) वजा स्वयंपाकाचे पान खूप भारी  दिसते. आधी तीन नैवेद्य काढाले जातात एक देवाचा, एक गायीचा, व गच्चीवर कावळ्यांना ठेवायचा व अग्नी देवतेला घास टाकून त्यावर तूप टाकायचे आणि मग ज्यांना पित्र म्हणून बसवले त्यांनी त्यांच्या ताटातला एक वेगळा घास काढून ठेवायचा मग जेवायला सुरवात करतात.

श्राद्धाचे पान काढल्यानंतर डाव-उजवं, समोरील व मध्य अशा चार भागातील पदार्थ वर सांगितले आहे त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो. एरव्ही आपण ताटात मीठ, लिंबू, चटणी वाढून सुरुवात करतो परंतु असे म्हणतात की श्रद्धाच्या पानात मीठ सर्वात शेवटी वाढावे जर लागले तरच पानावर वाढावे.

केळीच्या पानाला किंवा ताटाला तूप लावून मगच त्यावर सगळे पदार्थ वाढवेत. तुपामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पचन होते असा त्या मागचा हेतू असतो.
तसेच रोज वाढलेल्या ताटाचा नैवेद्य दाखवताना आपण उजवीकडून डावीकडे ताटाभोवती पाणी फिरवतो व नैवेद्य दाखवतो, पण आजच्या दिवशी डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो.
श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाला बोलून कोरडा (शिधा) देण्याची पण पद्धत आहे. आता ज्याला पितरांच्या तिथीला जमले नाही तरी सर्वपित्री अमावस्येला पण श्राद्ध करतात. त्यादिवशी आपले घरातील जे वाडवडील गेले त्यांच्या नावाने घास ठेवतात. हा पण एक पारंपारिक सणच आहे.
मातृदेवो भव पितृ देवो भव! 

         सूलहर 
लीलाताई वानखेडे 🙏

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"