अडगळीक्या खोलीत गेलेले शब्द
सहर्ष स्वागत करत आहे
"विचारमंथन"
"अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द"😊
उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि बहीण, भावंडांची मुलं नातवंड माझ्या घरी मुक्कामाला 8,15 दिवस होते मग आपल्या बोलीभाषेत त्यांना बोलते-
'ये कार्टे, कारट्या इथे काही करू नको, इथे हात लावू नको', 'इकडे अशी आडवी का पडली जरा डोक्याचा वापर कर', काही असे शब्द असतात. मग ते आपल्याकडे बघतात की ही अशी का बोलते?
आता हे शब्द अडगळीत जमा होत आहेत हळूहळू. नवीन पिढीत कोणी वापरत नाही. कारण सगळे इंग्रजी शाळेचे भोक्ते, आम्ही ते सर्वच वापरतो म्हणून एक आठवण झाली. त्याचे काही काही छोटे छोटे किस्से.
ऑफिसमधून घरी आले तर बहिण क्राफ्टचा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी करत होती.
म्हंटलं, "काय ग अशी फतकल मारून बसली मधेच!”
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?
फतकल???
बहिणीला म्हंटलं अग मिरा
"माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.”
तर तिची नात फिदीफिदी हसली,
म्हणते, "शी खुंटी??? What’s that?”
आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, बोळ ,घंगाळं, ओटी, परसदार, माडी, पोटमाळा
हे रोजच्या वापरातील शब्द होते.
किती उशीर झाला रे गोट्या दिवा “मालव” आता. असं आज्जी हमखास म्हणायची. कोकणात 'दिवा दवड' म्हणतात.
जेवताना आजी, आत्या नेहमी “राम” म्हणून ( एक घास) काढून ठेवायची. हल्ली तर असे, जेवणाचा टाईम नाही. वाती “वळायच्या” नसतात तर विकत मिळतात. जेवणाचं “पान”वाढायचे नसते तर serve करायचे असते. भात वाढ म्हणायचे नसते तर 'भात दे' म्हणायचे असते. देवघरातील वात “शांत” करायची नसते तर विझवायची असते.
चंदनाचे खोड आणि सहाणेची जागा रेडिमेड कोरडे अश्टगंध, आणि गंधाच्या खडूने घेतलीय. मेण मोठे कुंकवाचीची जागा टिकलीने घेतलीय. ती पण एकदम बारीक आणि आता तर नवीन पिढी तर ते पण लावत नाही. कपाळाला त्याचे पण होझे. बुशशर्ट ची जागा टीशर्ट ने घेतली आहे. नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या “saree” न घेतलीय. किंवा पंजाबी ड्रेस,गाऊन.
मनसोक्त ताव मारणाऱ्यांना खाण्यानंतर हल्ली “तडस” लागत नाही. तर over eating मुळे stomach tight होतं. पित्त न होता ऍसिडिटी होते.
थोबाड रंगावायचं नसतं तर एक tight slap द्यायची असते. खाण्यासाठी “बशी” नसते तर प्लेट/ डिश असते. चहाची बशी हा प्रकार तर इतिहास जमा झालाय. आता मोठ्ठा मगात थोडा चहा तो पण गार करून मोबाईल बघत.
थालीपीठ थापायला पळसाचे/ केळीच पान नसतं तर प्लास्टिक शीट असते. पूर्वी आमची आई, त्याला बोटाने 4,5 होल करत असत. आता तसे नाही.
ते भाजायला बिडाची काहिल. लोखंडी तवा जाऊन नॉनस्टिक तवा आला. बडगी फक्त खानदेशातल्या गृहिणींनांच माहीत असेल कदाचित. कात्रीची सीझर झालीय, तर शिवण यंत्र sewing machine झालंय.
डाव, पळी, भात्या, कालथा, उलथनं, खुरपणी ताटाला लावायचे वडगन, भाजीला डिश वापरत नव्हते डायरेक्ट पातळ भाजी ताटात घ्यायची त्याला खाली लावायला लागायचे ते वडगण (लाकडी चपटा तुकडा)
खूरपणी, वग्राळं, झारा आता, serving spoon, spatula, झालंय. बाक जाऊन बेंच आलाय, वजन काटा जाऊन weighing machine आलंय.
चालायचंच नाही का? कारण आता हे शब्द अडगळीच्या खोलीत न जाता store room मध्ये गेलेत. आपणही आता जमान्याशी “जुळवून” न घेतले पाहीजे जे, “easily adjust” होतोच की!!!
त्यामुळे फार विचार न करता, एका “डुलकी” ऐवजी “powar nap” घेऊया, सकाळ झाली की morning walk ला जाऊया 🤗🥰😊
*आज ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे*. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्या वस्तू तेथेच सापडायच्या._
पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्या कडे जाते.
जुनी घरे आठवताच हे शब्द आपसूक आठवायला लागतात. देवघर, स्वयंपाक घर, माज घर, ओटा, ओसरी, पडवी, कोठीघर हे शब्द आता परिस्थितीनुसार विसरायला झाले आहेत.
पहिले पोट माळा असायचा (आताच्या मराठीत अँटीक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी मुलांना अभ्यासाची पण जागा असायची.
तसंच आता 'व्हेंटिलेटर' फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोका वजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे, हे थोड्यांनाच माहीत असेल.
‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. तिथे काय काय खोचून पण ठेवायच्या वस्तू. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
.
.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं ठिकाण. पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी. ‘फडताळ’ ….. फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट याच फडताळात समर्थ रामदास विश्वाची चिंता करीत होते . खुंटी, कोनाडे, देवड्या, गोखल, हे असे काही अडगळीत गेलेले शब्द. जुन्या घरातील असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा गरम पण्या साठी तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला खरबडी दगड ‘वज्री’, अन तांब्याचे तांब्या ‘घंगाळ’ हे असायचेच. तेही आता कालबाह्य झाले, त्याचे आता बाथरूममधे रूपांतर झाले .
गृहिणीची( शृंगार पेटी) कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डबी, कुंकू , डोक्याचे आकडे , अशा वस्तू गडप झाल्या. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. ड्रेसिंग टेबल प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.
लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला. वेण्या काय फक्त एक सरळ शेपटा घालायचा घट्ट तो पण महिलांनी तर किती ही मोठे केस असले तरी आंबाडा घालायचा . आता मोठे केस असले तरी केस कट करायची फॅशन आहे.
स्वयंपाकघरातील चूल-ऊल गेली त्याचबरोबर चूल, वैल,निखारे, हार, भाकरी भाजायचे त्यावर हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, बोघण कथली, रोळणी, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची वाटी गायब.
‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, नंदाळे,हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे , झोऱ्या सगळे शब्द हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो तोही गणपतीच्या आरती मुळे , पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली.
सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली. सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
पोहे हार, लक्ष्मी हार, चिंचपेटी...असो!
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.
सूप खुंटीवरून बाउलमधे आलं.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई. तेही वर्षभरासाठी.
जेवण्याची पितळी, ताट,वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.
‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.
उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप , गडी,म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. हे पण अडगळीतील नावे आहेत …
लाइट आले आणि अनेक तर्हेचे दिवे गडप झाले. उदा. कंदील, रॉकेलचा दिवा (चिमणी) मोठमोठे झुंबर काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच….
काय ?….. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ना…?
सुलहर,,🖋️🙋😊
Comments
Post a Comment