नात्याची रेसिपी

स्वागत करत आहे "विचारमंथन"
     🌹नात्याची रेसिपी🌹
श्रावण महिना सुरू झाला. सणवार आले की घरात स्वादिष्ट सुग्रास भोजनाचे ताट समोर येते. तेव्हा त्याविषयी थोडे काही लिहावे असे वाटले.
नात्याच्या रेसिपीत पण अशीच काही जवळजवळ साम्य आहे.
ते असे की वाढलेले पूर्ण पदार्थाचे ताट किती छान  दिसतात. प्रत्येक पदार्थ जिथल्या तिथे प्रत्येक पदार्थाला आपली एक स्वतःची चव आणि ठरलेली जागा सुद्धा असते. आपले आयुष्य पण असेच काहीतरी असते. आपल्या हृदयात आपल्या माणसांचा तसेच आपल्या प्रत्येक नात्याशी एक वेगळाच गोडवा असतो. भोजन वाढण्याची सुरुवात होते मिठाने डावीकडून पण सुरुवात (लेफ्टने झाली तरी ती ऑलवेज राईट) असते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव हे आपल्या आयुष्यासारखे आहे. आपले आईवडील ज्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळतो त्यांच्याशिवाय आपले जीवन बेचवच असते. मायेने डोक्यावरून हात फिरवणारे असावे, पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि हिम्मत देणारे दोन शब्द असावे. ताटाच्या मध्यभागी (सुगंधी तांदुळाचा) वरण-भात कालवल्यावर तो एक जीव झाला की परत (वरण-भात)वेगळा करतात येत नाही. तसेच हे असते नवरा बायकोचे नाते. थोड्याशा अवधीत किती एकजीव होतात, ते समजत पण नाही.
आपली मुले :-वरण-भतावर साजूक तुपाची धार नसेल तर भाताला काय चव? ही चव आपल्या जीवनात आणतात ती आपली मुलेच त्यांच्याशिवाय जीवन निरस असते. आजी-आजोबां साठी ते तर ते तर दुधावरची सायच. 
वरण भाताच्या थोडी वर असते "साधी पोळी" कशीही लाटा, आपण देऊ तो आकार घेते. खरपूस चांगली भाजून पानातल्या सगळ्या पदार्थांच्यात समरस होते. ती पोळी म्हणजे आपल्या घरात गृहप्रवेश करणारी आपली सून! आल्याआल्या सगळ्याच नात्यांचा अगदी मनापासून स्वीकार करते. सगळ्यांशी समरस होते, आणि अलगद आपली कधी होते ते समजतच नाही! 
(उजवीकडे )असते ती भाजी, कधी रस्सा कधी सुखी, कधी तिखट कधी आंबटगोड, कधी मसालेदार पण पानात अत्यंत आवश्यक असते. कोणतीही असली तरी चालते पण पाहिजे. हे नाते असते बहिण            भावांनांचे:- कधी प्रेमाचे ,कधी मस्ती, कधी रुसवा  फुगवा! एक तरी बहिण भाऊ असावाच. कधी अडचणीत हाक मारायला, कधी कौतुकाची थाप द्यायला तर कधी खंबीरपणे पाठीशी उभे रहायला
कधीतरी लुटूपुटूचं भांडायलासुध्दा! पानात कधीतरी वाटीत असत काहीतरी गोड किंवा पक्वान्न जे आपण रोज खातो असं नाही पण ते असल्यावर जेवणाची लज्जतच चवच न्यारी!!
(हेच आपले आप्तेष्ट आपले नातेवाईक आपले सगेसोयरे रोज न भेटणारे) पण सणासुदीला आणि समारंभात आवर्जून भेटणारे. ज्यांच्या भेटीने आपले दोनचार क्षण खूप मजेत जातात. ज्यांचे असणे गरजेचे आहे. ही आपली विसाव्याची ठिकाणे असतात. रोजच्या रहाटगाड्यातून थोडासा विसवा, यायला- जायला काही हक्काची घरं पाहिजे. 
आता मिठाची जागा :-खालची असते  लिंबू, मीठ, चटणी, लोणचे  सगळ्या जेवणाची लज्जत वाढवणारे (आंबट ,गोड, तिखट )चविष्ट! हे काम असते आपल्या
मित्र-मैत्रिणीचे :- आपल्या जीवनात हास्य आणणारे सतत आशावादी व प्रेरित करणारे आपल्या मदतीस धावून येणारे. आपले सुख -दुःखाचे सोबती, आपल्या आयुष्याची रंगत  वाढवणारे, चटणी-लोणचे.
 नंतर नंबर लागतो तो कोशिंबिरीचा:-कुठलीही असो, काकडी, टमाटे, गाजर, दह्याचे रायते साधारण पौष्टिक असते. कधीकधी भाजी नसली तर तिची जागा घेणारे. भाजीच्या ऐवजी मदतीला धावून येणारे. हे झाले आपले शेजारी! थोडा राग लोभ असू शकतो, पण मनात किल्मिष न ठेवणारे, घरातल्या अडचणीत मदतीला धावत येणारे. प्रसंगी वडीलधाऱ्यांची जागा घेणारे.
(हे पदार्थ आणि नात्यांची तुलना नाहीतर साम्य आहे )
प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म  त्यात वापरलेल्या साहित्यांचा सुद्धा. जसा मिठाचा खारटपणा, साखरेचा गोडपणा, चिंचेचा आंबटपणा, मिरचीचा तिखट व मेथीचा कडू कडवटपणा. कारल्याचा गुणधर्म तर ते कडू!, म्हणून आपण टाकून देतो का?नाही उलट चिंच-गुळ घालून त्याला कडवटपणा कमी करतो; हेच नात्यांच्या बाबतीत असते. परिस्थितीने नात्यात कडवटपणा येऊ शकतो पण म्हणून आपण नाते विसरत नाही! काही आंबटगोड आठवणींच्या साह्याने नात्यातला गोडवा परत आणण्याचा प्रयत्न करतो. तोंड कडू पडले तर सुग्रास जेवण पण बेचव लागते. म्हणून जेवण सोडतो का? नाही! आपल्या आवडीने चवीत थोडा बदल करतो. असाच बदल वेळोवेळी नात्यात पण करावा लागतो.नाती टिकण्यासाठी, ते सांभाळण्यासाठी!
पंचपक्वान्नांसमोर आहेत पण ठसका लागला तर पाणी देणारे कोणी नाही. पाठीवरून मायेचे हात फिरवणारे हात नाही. आपुलकीने हवे नको विचारणारे दोन शब्द नाहीत तर ती पक्वान्न काय कामाची?
पदार्थत सगळे जिन्नस त्या त्या प्रमाणात असतील तर तो उत्कृष्टच होतो. कशातही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतात. नात्यात पण हवाच की रुसवाफुगवा, राग, लोभ, प्रेम, माया कधी मत्सर सुद्धा! पण सगळे प्रमाणात प्रत्येक नात्यात प्रेम, आदर, सन्मान आणि मर्यादा असाव्यात. याचा अतिरेक झाला की नाती बिघडतात, मग ते प्रेम असले तरीही. एवढे सांभाळले तर दुरावा कदाचित येणार नाही.
नाती आदर्शच असावी, असे नाही. पण जपावी कधी कधी. वरून आदर्श वाटणारी नाती आतून खूप पोकळ असू शकतात.
 नाती आपल्यासाठी असावी आणि ती आपण मनापासून जपावी. राग, लोभ  रुसवेफुगवे, प्रेम, माया, मत्सर, आदर, सन्मान, मर्यादा हे सगळे त्या त्या प्रमाणात असले की झाले नात्याची रेसिपी तयार!प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ?
मग नात्याची रेसिपी एकदम चविष्टच राहणार.


                         सुलहर 🖋️

Comments

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"