गाद्या घालणे
""सहर्ष स्वागत करत आहे
"विचार मंथन"
🌹अंथरूण घालणे🌹
परवा आमच्याकडे पाहुणे आले बरेच जण होते, पूर्ण दिवस मजेत गेला. पण रात्री झोपायची व्यवस्था करायची म्हणजे मोठे काम, ते मी ठरवले तसे आजकाल मोठे घर असल्यामुळे तशी चिंता नसते, माझ्या बेडवर तू झोप. त्या रूममध्ये तुम्ही झोपा. मी त्या रूमवर झोपेन, असं करून आपल्या आपल्या रूममध्ये सगळे जाऊन झोपून गेले. त्यावेळेस मला आठवलं की पूर्वी आपण सर्व लहान असताना काही वर्षांपूर्वी, मला माझे लहानपण आठवले आणि तिथेच रेंगाळत राहिले. चाळीसगावला असताना दिवसा सगळे काम झाल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस अंथरून टाकणे हा एक मोठा विषय आहे . 'अंथरुणे घालणे आणि काढणे' म्हणजे हा एक बायांचा कामाचा एक उर्वरित भाग होता. सर्व काम आटोपल्यानंतर सुद्धा रात्री शेवटचे काम हेच ते घरातील मोठया माणसांचे (आजी,आई,आत्या, काकू) यांचे असे अंथरुण टाकणे. प्रत्येकाच्या गादीला पांढरीशुभ्र चादर, उशाला पांढरे कव्हर, पांघरायला (पांघरूण) थंडी असेल तर ब्लॅंकेट. साधारण गरमी असेल तर बारीक चादर देणे त्यांच्या डोक्याशी पाण्याचे तांब्याभांड पाणी भरून ठेवणे हा एक खूप कामाचा मोठा भाग होता. ही आजोबांची शिस्त हे रोज घरातल्याच लोकांसाठी पाहुणे असतील तर अजून वेगळी व्यवस्था घरातच खूपच लोक असायचे जवळ जवळ पंधरा-वीस लोक होते. रोज प्रत्येक एका गृहिणीला म्हणजे काकू , मोठी आई, मी अजून कोणी एकाची पाळी असे. उन्हाळा असेल तर गच्चीवर गाद्या घालायच्या प्रत्येकाची जागा, चादर, उशी ठरलेली त्याप्रमाणे सर्वांनचे अंथरून टाकायचे हे करायला जवळ जवळ एक दोन तास लागायचे , पहिले गच्ची झाडून घेणे मग पहिले सतरंजी मग त्यावर गादी मग चादर आणि थंडी असेल त्यावेळेस जाडसर कापसाची दुलई वापरायचे. चादर घातल्यानंतर एक सुद्धा वळ यायला नको. नंतर भुसावळचे घर डोळ्यापुढे आले
पूर्वी रात्रीची जेवणं नऊ- साडेनऊच्या सुमारास होत असत. नंतर लाईट बंद करायचे कारण सकाळी मुलांची सकाळी शाळा, ऑफिस असायचे पण वडिल आणि काकांचे रेडिओवर बातम्या, रात्रीचे शास्त्रीय संगीत ऐकणे चालू असायचेच त्यावेळेस आमचे गाद्या घालण्याची काम चालू असायचे. रेडिओवरची श्रुतिका ऐकत कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीत सभा ऐकत सर्व झोपेच्या आधीन होत. तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे तेंव्हा घरात पलंग ते म्हणजे लोखंडी उभ्या आडव्या पट्ट्या असलेली दोन होते. तीन खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती. सिंगल बेड, डबल बेड, सोफा कम् बेड, बंक बेडचा तो जमाना नव्हता. त्यामुळे घरातील एक कॉट वडिलांसाठी व एक काकांना राखीव असे. ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना तो मिळे. त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं. उन्हाळा असला तर गॅलरीत लाईनशीर आगगाडीच्या डब्याप्रमाणे प्रत्येकाचे अंथरून टाकायचे. त्यावेळेस प्रत्येकाला गादी मिळत नसे. जाड गोधडी, झोऱ्या, सतरंजी असायची. घरात भिंतीला टेकवून गाद्या ठेवण्याची लाकडी (घडवंची) तिला चार पाय असायचे त्यावर सगळ्या गाद्या, उशा व्यवस्थित घड्या घालून ठेवायचे. ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत. त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे म्हणजे जुनं फाटक असले तरी बाहेर दिसायला नको तसेच गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.
गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे. पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही, असा नियम होता कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ. केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.
गाद्या घालायचं काम वर सांगितल्याप्रमाणे साधारण घरातली महिलाच करत. लहान बहिणी, भावंड आवडीने मदत करत. गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. त्यावर धूळ कचरा अजिबात दिसायला नको. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची. त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे. त्यावेळेस अर्धा एक तास असा खेळ चालायचा त्यावेळेस ते पण एक करमणुकीचा भागच होता मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू चादर ताणून गादीखाली दुमडून टाकायची एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिल व काकांचा कटाक्ष असे. हे सगळं करताना घरातलं लहान मूल असतील तर ते हटकून मध्ये मध्ये करणार. त्यांना गाद्या घातल्या की खेळयला खूप आवडे. नेमकं हे मोठ्यांना आवडत नसे
मुलं कोलांट्या उड्या मारत हा खेळ रोज चाले. म्हणून गादी घालणे हे मुलांनाही काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे. शेवटी डोक्याशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर पाण्याचे भांडे ठेवल की हे काम पूर्ण होत असे. गादीवर अंथरायची 'बेडशीट ' च पाहिजे, असं काही नाही. आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडी, किंवा गोधडीसुद्धा पांघरायला असे. हे सगळं झालं की भिंतीच्या आधार घेऊन वडिलांचे पाय दाबणे असा एक कार्यक्रम असे.
आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही. पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या डोक्याला, तळपायाला तेल लावून देत असे, थंडीत मुलांच्या पायांच्या भेगाना कोकम तेल लावत असे,
उन्हाळ्यात लहान मुलांना तर वर्तमानपत्राच्या घडीने झोप येईपर्यंत वारं घालत असे... सगळं निरपेक्ष... शेवटी आई ती आईच!
असा हा सर्वांकडे गाद्या घाल्याण्याचा मोठा कार्यक्रम असे.
फक्त आठवणी राहिल्या. आता हे काळाच्या आड गडप झाले.
कालाय तस्मै नमः
सुलहर🖋️
खरच! खूप अप्रतिम लेख लिहीलयं जुन्या आठवणींना पाँलीश केल्या त्या नविनच आत्ताच्याच आहे हे वाटत आहे.छान
ReplyDeleteसुप्रभात आपणही तेवढ्या आत्मियतेने वाचल्या म्हणून त्या अजून छान खुल्या असेच प्रेम ठेवावे धन्यवाद🙋
ReplyDeleteKhuup chhan junya athavanina nava ujala wow
ReplyDelete,🙋होना 😊👍
DeleteKhup chaan. Ti majjach vegli hoti. Pahune aale ki khup chaan vatayche. Kaha gaye wo din.
ReplyDelete