खुलभर वाटी

सहर्ष स्वागत करत आहे "विचारमंथन" 

   🌷खुलभर वाटीची कहाणी🌷 

परवा अचानक घरी पाहुणे आले होते तर घरात साखर नव्हती. नातीला हळूच म्हटले की जा शेजारच्या ताईंकडून वाटीभर साखर आण बरं! साखर संपली आहे. तर ती मला म्हणाली की अगं शेजारीहून एक वाटी साखर? मी नाही जात. मला लाज वाटते. असे म्हणून मागे गेली, मग मी गेले व पाहुण्यांना चहा करून रवाना केले. मग तीला जवळ बोलावलं खरं तर मी भूतकाळात शिरले .
अग आमच्या लहानपणी काय आणि आत्ता काय आम्ही बिनधास्त काही संपलं कि, शेजारच्या शोभा ची आई, सुजाताकडे, काकूंच्या स्वयंपाकघरात जाऊन हक्काने मागून आणायचो, काहीही! कारण आमचे मोठे कुटुंब होते, कितीही आणले तरी संपतच असे.
आम्ही वाड्यात पाच बिऱ्हाड रहात होतो... पण जास्त जवळीक म्हणजे भाभी, चव्हाण व लकडे (म्हणजे बेबिताईची आई) , यांचं घर आमच्यासाठी नेहमीच उघडे असायचे. शेजारच्या शोभा ताई ची आई तर आमच्याकडे कोणी आजारी असले तर गरम गरम फोडणीचं वरण भात ,दही भात ,मेटकुत भात असं आवर्जून आणून द्यायच्या कारण त्यांच्याच खुप मऊ व चविष्ट व्हायचं कमी तिखट असायचं त्या स्वतःहून म्हणायच्या तुला बर वाटत नाही ना मी आणून देते थोडे तोंडाला चव येईल आमचे घर म्हणजे भिंतीला भिंतीला लागूनच होते फक्त राहायचं वेगळेपण सगळे एकत्र परिवराप्रमाणे  असायचे आमचं व मुलांचं बाळपण वाड्यातच गेले. खूप मजेत व आनंदी गेले.
कितीही मुलांवरून किंवा इतर गोष्टींसाठी भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी एकत्र असायचो. ज्यांचं बाळपण वाडा संस्कृतीमध्ये गेलाय. त्यांनी हे उसने घेण्याचे महान काम एकदा तरी केलेच असणार याची खात्री आहे. तर... त्या नात्यातील गोडवा साखरेहून गोड असायचा बघ.
मला तर अजूनही तो वाडा डोळ्यांसमोर आठवतो. घरात आई स्वयंपाकाला लागली आणि काही तरी संपल कि, आई हाक मारून लगेच वाटी हातात देऊन त्यांचाकडे पाठवायची. कधी तेल, पिठ, इ. दूधसुद्धा "परत आणलं कि देऊ", असं आश्वासन  देऊन आणायचो. कारण लगेच दुकानांत जाऊन अणू शकत नव्हते. सर्व लहान मुले आणि शाळेत जाणारे. वडील डे नाईट ड्युटी तर काका ऑफीसला. घरात आई, काकू आणि 10 एका पाठोपाठची मुले. नाईलाज अश्या परिस्थितीत अडचणीच्या वेळेस ती एक वाटी साखर म्हणा कि एक कप दूध अजून कोणताही पदार्थ असेल ती वेळ निभावून जायची. ती एक वाटीभर साखर आणताना आमच्या घरी कोण आलाय? किंवा त्यांच्यांकडेही कोणी आलाय हे  आपल्याला कळायचंच.
'घरी पाहुणे आले का'? मग घरी घेऊन ये त्यांना . एखाद्या दिवशी  आवडीचा  पदार्थ घेऊन त्या येणारच. त्यानच्या नंतर त्यांच्या सूना सुजाता व शुभांगी वहिनी!
कोणाकडे आपले नातेवाईक, बहिणी, भाऊ आले म्हणजे तितक्याच प्रेमाने एकमेकांकडे कधी पोहे, इडली, नस्त्याचा बेत करायचं सगळे. कधी शेजारी कोणाला बरे वाटत नसले की आई लगेच आल्याचा चहा, संध्याकाळी गरम भाकरी, खिचडी घेऊन जा व रात्री झोपायला सोबत म्हणून ते येणार नाहीतर मी जाणारच. 
वाड्यात जर माहेरवाशी मुलगी ,सून सतव्यात आली असेल तर विचारूच नका, प्रत्येकाकडे जेवण, नाष्टा, कुणाची लोणच्याची वाटी, तर कुणाची भाजीची वाटी, खिरीची वाटी घेऊन आवर्जून घरी  भेटायला येणारच. वाटीत  किती आणलं हे महत्त्वाचं नाही. वाटीत काही आणल आहे हा आनंद आणि ते सर्व मिळून खायचो, हा त्याहून जास्त आनंद!
"रिकामं भांडे परत देऊ नये" म्हणून मग परत जो काही खास पदार्थ असेल तो भरून दिला जायचा त्यात अशी रीतच आहे. कुणाच्या घरात कार्यक्रम असला तर शेजारचे कमी पण त्यांची भांडी जास्त असायची घरात. 
कार्यक्रमात ठेवणीतले भांडे म्हणजे कुणाकडे मोठी कढई असेल, ताट, वाट्या, ग्लास, मोठे पातेले, नसेल तर माळ्यावरून काढून वापरायला दिले जायचे.
ही एक भाजीची छोटी वाटी, एकमेकांच्या घरात माणसांना भेटायला मदत करायची. त्या निमित्ताने कुणाला काय अडचण आहे, कशाची गरज आहे हे कळायचं. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता यायच. खऱ्या अर्थाने शेजारधर्म पाळला जायचा. 

आई जर गावाला ,माहेरी गेली तर "आज हे केलं आहे तुला आवडत ना म्हणून मुद्दाम आणलत ", हे बोलणं खूप आधारच व मायेचं असायचे. आई नसताना हीच भरलेली वाटी घेऊन काकू, वहिनी, लक्ष ठेवायला यायच्या. 

आताच्या तुमच्या युगात तर सगळं रेडिमेड मिळते. कोणाला मसाला भाजी कोणी वाटीभर चवीसाठी आणून दिली तर गांवढळ वाटेल, उगीच घरात इंटेरफियर करतात असेही म्हणतात .
अग पण आम्ही सुट्टीच्या दिवशी गच्चीवर, ओट्यावर अंगतपंगत करायचो, कधी चांदण्याच्या प्रकाशात मस्त पार्टी चा आनंद लुटायचो. कधीही न विसरणारी गप्पांची मैफिल, सोबत खिरीची वाटी, तर कधी भरीत भाकरी, तर कधी शेवभजी, सगळा स्ट्रेस निघून जाई. ज्याच्याबरोबर रक्ताच नातं नाही अशी व्यक्ती वाटीभर पदार्थ आपल्यासाठी काही तरी करून आणते ही कल्पनाच मन रिलॅक्स करणारी आहे. वाईट वेळेत याच धावून येतात, आधार देतात, सोबत करतात.
वाड्यात लकडेआजी म्हणजे सर्वांना त्यांचा धाक असायचा. त्या काही चुकले तर ओरडल्या की  मग आईजवळ रडत जायचो पण आई  असू दे काही होत नाही मोठ्या आहे त्या असं म्हणायची, असा राग यायचा, नंतर दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या म्हणायच्या 'राग आला आहे का ग?' तोंडावरून हात फिरवायच्या परत असे करू नको. कोणाकडे लग्न समारंभ काही कार्यक्रम असला म्हणजे सगळे सकाळ संध्या काळ जेवायला तिकडेच, जसे काही अपलाच  कार्यक्रम आहे .
घर वेगळे पण आनंद , दुःख एकच सामूहिक.
तुम्ही आजच्या काळात शेजारी 'एक वाटी साखर' मागायला गेलात का कधी ? एवढेच काय सणावाराला जेवणाचे पूर्ण ताट सुद्धा द्यायचो एकमेकांकडे आनंदाने ( प्रमा पोटी)
भांडी, म्हटली तर साधीच ना, पण ती एकमेकांकडून आणल्याशिवाय  राहायचे नाही. पडली कि चेमटली अथवा फुटली  पण त्यातही खूप आठवणी असतात. सासुरवाशीण "माझ्या आईनं दिलंय" या आठवणीनं त्या भांड्यात तिचे रूप पाहत असते. माहेरी गेल्यावर याच भांड्याकुंड्याना पाहताना खूप आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोर येतात.
तर अश्या ह्या वाटीभर उसण्याची वा नात्याची किंमत तुला काय आणि आजकालच्या तरुण पिढीला काय माहीत! त्या वाटी भर उसने घेणे देण्याचं👍😊

कालाय तस्मै नमः 🙏


                               सुलहर🖋️

Comments

  1. खूप छान लिहीलय जुन्या आठवणींना उजाळा व त्या काळात घेऊन गेल्याचे हाेतय.💐👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"