पुडाच्या पाटवड्या
सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "
खान्देशी पुडाच्या पातोड्या
- "अहो ऐकलं का ? उद्या आपल्याकडे जावई, विहीणबाई व व्याही येणार आहेत, मग काय बेत करायचा ? "
- "अरे हो ! काय करायचं ?".
- "काल रव्या बेसनाचे लाडू करून ठेवलेच आहेत, अजून नवीन काय करायचं ?"
- "आपण पुडाच्या पाटवड्या करू खान्देशी! हे सहसा मुंबईकडील लोकांकडे करत नाही".
जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्याकडे आवर्जून केल्या जातात. एकदम दमदार - टेस्टी पदार्थ ! चला मग लागा तयारीला .आधी सर्व साहित्य घरात पाहिजे म्हणजे मनाप्रमाणे होतात. कुठलीही गोष्ट कमी किंवा नाही , चालवून घेऊ असे चालत नाही .
तर मग लिस्ट तयार करा -
डाळीचे पीठ, मसाला , खसखस ,कोथिंबीर, खोबरं, कांदे ,तेल, तिखट, मीठ, हळद, जिरे, इत्यादी.
आता पूर्वतयारी -
पूर्वतयारी करून घेतली की आपण त्यात टाकायची कुठलीही वस्तू विसरत नाही आणि पदार्थ व्यवस्थित होतो.
भरपूर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. पानं घ्यायची , काड्या वेगळ्या ठेवायच्या. त्याची दोऱ्याने जुडी बांधायची व आमटी उकळत असताना त्यामध्ये सोडायची त्याचा पूर्ण अर्क येतो व चव छान लागते. डाळीचं पीठ चाळून घ्यायचं, कांदे बारीक चिरुन घ्यायचे, खोबर्याचा किस करून घ्यायचा, खसखस थोडी भाजून घ्यायची.
हा मसाला आमटी करता भाजून घ्यायचा व नंतर वाटून घ्यायचा. या पदार्थाला घाई चालत नाही. पूर्वी एकाच घरात खूप लोक रहायचे त्यामुळे तिघी - चौघी मिळून हा पदार्थ करायच्या आणि जास्त प्रमाणातही कराव्या लागायच्या.
पाककृती:-
मसाल्याच्या पाटवड्या:-
दोन वाट्या डाळीचे पीठ असेल तर एक दीड वाटी पाणी प्रमाण घ्यायचे. आपल्याला किती लोकांचे करायचे त्या प्रमाणात पीठ वाढवायचे. पहिले पातेल्यात अथवा कुकरमध्ये पाणी उकळत ठेवायचे त्यात थोडे तेल घालायचे , हळद घालायची, ओवा घालायचा. उकळी आली की त्यात तिखट मीठ चवीप्रमाणे घालायचे. तिखट नको असल्यास नाही टाकले तरी चालते. पीठ टाकायचे. चांगले मिक्स करायचे. गाठी पडायला नको. त्याला घेरणे किंवा उकड घेणे पण म्हणतात. मग चांगले स्वच्छ पांढरे कापड ओले करून मंद आचेवर पीठ शिजत ठेऊन कापड पिठावर छान घट्ट झाकून ठेवायचे. छान भरपूर वाफ भरली पाहिजे. हात लावून बघायचे शिजले की नाही ते. मग असेच गरम गरम परातीत काढायचे. हाताला तेल लावून कापड किंवा प्लॅस्टिक कागद टाकून हाताने चांगले मळून घ्यायचे व पोळी सारखे लाटायचे. पीठ गरम असेपर्यंतच छान लाटले जाते .
पोळी तयार झाली की मसाल्याचे तेल छान साटा लावतो त्याप्रमाणे लावून घ्यायचे. त्यानंतर कांद्याची करपी छान गोल व्यवस्थित पसरवायची . जास्तही नको आणि कमीही नको. नंतर त्याची चपटी घडी घालून एक चपटा रोल करायचा. वडी तयार होते. त्याच्यावर परत मसाल्याचे थोडे तेल लावायचे. त्यामुळे वरून टाकलेली वस्तू त्याला चिकटून राहते. त्यावर खसखस, कोथिंबीर, खोबरं घालून विशिष्ट पद्धतीने कापायचे. सोबत फोटो देत आहे
खाली सविस्तर रेसिपी दिली आहे.
मसाला तेल -
कढईत तेल टाकायचे. तेल थोडे जास्तच घ्यायचे. चांगले गरम झाले की जिरे, मोहरी, हिंग, आणि काळा गोडा मसाला टाकायचा. फोडणी गार करत ठेवायची.
कांद्याची करपी -
कढईत भरपूर तेल घ्यायचे. गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, हळद व कांदा टाकायचा . कांदा चांगला गुलाबी झाला की त्यात तिखट, मसाला, खसखस, खोबर्याचा किस, कोथिंबीर सर्व टाकायचे. सगळे परतून झाले की खाली उतरवून ठेवायचे.
मसाल्याची आमटी -
आपल्या पद्धतीने व आपल्या आवडीप्रमाणे लाल मिरच्या, कांदा ,खोबरं, कोथिंबीर ,वरती कोथिंबीरची जुडी केलेली असते ती आठवणीने टाकायची. छान उकळी आली की उतरवून ठेवायचे . वरती तवंग आला पाहिजे.
साध्या पातोड्याची रेसिपी -
पाणी उकळत ठेवायचे. जाड पातेलं किंवा कुकर घ्यायचा. तेल, चवीला मीठ, ओवा टाकायचा . पीठ टाकायचे. वरीलप्रमाणे छान घेरून घ्यायचे . भरपूर वाफवून कपडा टाकून झाकून ठेवायचे. वर सांगितल्याप्रमाणे त्याची पातळशी पोळी लाटायची. लाटल्यावर त्याच्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या किंवा तिरप्या अशा वड्या पाडायच्या. वरून थोडी खसखस लावायची. पिवळ्याधमक छान दिसतात. काडीच्या टोपलीत ठेवायच्या किंवा जाळीमध्ये ठेवायच्या .
इतका खमंग आणि रुचकर बेत, ह्याच्या पेक्षा दुसरा कोणताच असू शकत नाही .खूप मेहनतीचा आणि पेशन्सचा आहे. पण एकदा खाल्ला की मन भरून जाते. विशेषतः पाहुण्यांकरता विशेष बेत असतो .वर्षातून एखाद - दोनदा तरी होतो .आपण तो करावा व खायला बोलवावे.
सुलहर 🖋️
फारच tasty
ReplyDeleteपुडा ची वडी मस्त झाली खूप सुंदर लेख लिहिला👌👌
ReplyDeleteस्वादिष्ट पुडाच्या वड्या लेखन वाचलेउत्तम रेसिपी असून लिखाण वर्णन सुंदर आहे.चविष्ट रेसिपी निवडून त्याचे वास्तविक लिखाण बद्दल आपले मनस्वी अभिनंदन
ReplyDeleteस्वादिष्ट पुडाच्या वड्या लेखन वाचलेउत्तम रेसिपी असून लिखाण वर्णन सुंदर आहे.चविष्ट रेसिपी निवडून त्याचे वास्तविक लिखाण बद्दल आपले मनस्वी अभिनंदन
ReplyDeleteअरूण चौधरी
आपल्या लेखाप्रमाने पात वड्या अतिशय स्वादिष्ट लागतात त्याचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते .हा पदार्थ अतिशय खमंग व चविष्ट असतो.ती भाजी तर आहाराची लज्जत वाढवते .लाल चमचमीत मसालेदार भाजी खरोखर स्वादिष्ट असते.लीलाताई तुमच्या पात वड्याच्या लेख बद्दल तुमचे आभार व अभिनंदन.
ReplyDeleteअर्चना चौधरी
फारच छान रेसिपी आहे. लेख पण 👌👌
ReplyDelete