"हात शेवया"👍🏻

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "

🌹 शेवया  🌹

एप्रिल - मे महिना आला की हमखास उन्हाळ्याचे वाळवणाचे प्रकार घरोघरी होतात. त्यातला एक प्रकार शेवया. ह्या  शेवया तीन चार  प्रकाराने बनवतात -  
1) हात शेवया
2) पाटावरच्या शेवया
3) मशीनच्या शेवया
4) विदर्भातल्या हात शेवया -  त्याची पद्धत एकदम वेगळी. एकच गोळा हातात घेऊन त्याचे वेगवेगळे पदर काढतात. 

अजून एक प्रकार त्याला सुरगुंडे म्हणतात. ते एका जाड लांब काडीला शेवयाच्या पिठाचं सूत गोल गोल स्प्रिंग सारखे  गुंडाळायचे. मग ते वाळवायचे. ते अगदी स्प्रिंगच्या आकाराचे बनते. ते आंब्याच्या रसात टाकून खाण्याची पद्धत आहे. छान लागतात म्हणे. आमच्या शेजारी अरुणा राहते ती ह्या करते म्हणून मला माहिती. ही पण पद्धत कलाकौशल्य मेहनतीची आहे. पण हात शेवयांची चव काही न्यारीच. खूप मेहनतीच्या असतात या. आता सहसा कोणी करत नाही. बाहेरून  करून आणतात. याचे जागोजागी मशीन निघाले आहे. घरून गहू घेऊन जायचे व जाड बारीक पाहिजे तशा करून घ्यायच्या. पण हात  शेवयांची सर नाही . पूर्वी ह्या घरीच करायचे व आजकाल न्युडल्स म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पाकीटच मिळते . पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा आई ,काकू, आत्या, हात शेवया आमच्या घरी करायचे. बापरे केवढी मोठी प्रोसेस असते तिची. पण शेवया खाव्या तर त्याच. केसा सारख्या बारीक व मऊसूत . उन्हाळ्यात सर्व वाळवणाचे प्रकार झाले की अगदी निश्चिंतपणे करायचा हा पदार्थ. कारण याला सगळा गोतावळा लागतो. अगदी लहान मुलांपासून मोठ्या आजीबाई पर्यंत.

साहित्य:- ठराविक  जातीचे गहू, दोरी, एक लांब काठी, पाटा ,बत्ता , डालडातूप , ताट ,छोटे चौकोनी हात रुमाला एवढे 8/10 पांढरे धोतराचे कपडे आणि भरपुरsss वेळ. मुख्य म्हणजे मदतीला पाहिजे शेजारच्या काकू, मावशी ,आत्या, ताई. असे हे एकट्याचे काम नाही म्हणून गोतावळा म्हटलं. काठी दोन खुंट्यांवर दोरीने बांधून खाली हात पुरेल अशा अंतरावर बांधायची. पाटा-वरवंटा म्हणजे पूर्वी वाटायला दगडाचा चौकोन,  त्यावर पीठ कुटण्यासाठी  खलबत्याचा बत्ता. पूर्वी खलबत्ता सर्व वस्तू  बारीक कुटण्यासाठी वापरायचे ते म्हणजे तिखट ,हळद, धणे, मसाला ,दाणे ,असे बरेच काही. आतातर प्रत्येकाकडे मिक्सर आहेच. 

शेवयांसाठी गहू वेगळे मिळायचे ते आधी एका घमेलीत मोजून घ्यायचे. मग त्याला थोडे पाणी लावून बांधून ठेवायचे. जात्यावर दळायचे. त्यावेळेस घरोघरी 'जाते' होते. आता गिरणीतून दळून मिळते. दळल्यानंतर वस्त्रगाळ करून त्याचा रवा आणि पिठी वेगळे वेगळे करायचे. मग सुप घेऊन पाखडायचे  म्हणजे कोंडा निघून जातो. ही पण एक कलाच होती. ती सगळ्यांना नाही जमायची. हे काम माझ्या आईकडे असायचे. मग सकाळी लवकर उठून पीठ भिजवायचे. पूर्वी टीनोपॉल मिळायचे.  एक किलोला त्या डबी चे मीठ टाकायचे प्रमाण/माप ठेवले होते. अगदी तंतोतंत हिशोब होता त्या डबीचा. मग ते पाच सहा तास भिजल्यानंतर चांगले तूप लावून पाट्यावर कुटायचे .अगदी मऊ करायचे. एक दिवस एक - दोन किलो भिजवायचे .परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असे चालायचे. 7/8 किलोचे करायचे आमची आई कारण घरात दहा-पंधरा लोकांचा परिवार होता .शेवयांचे पीठ भिजवल्यावर त्याला खरबूजाचा ,आंब्याचा वास लागायला नको असे सांगायचे जुनी लोक. त्यांना दृष्ट पण लागते म्हणे, तेव्हा त्या काठी वरून खाली पडतात. मग एक दिवशी ठरवून दुपारी सर्वांना बोलावून दुपारी दोन वाजेपासून सुरुवात करायची तर संध्याकाळी सहा पर्यंत चालायचे .एका ताटात भिजवलेल्या गोळ्याची लाटी घ्यायची. त्यात तुप लावून दोन्ही तळहाताने घासून घासून बारीक करायचे. सगळे गोळे ओल्या कापडाने झाकून ठेवायचे. कपडा पाण्यातून पिळून घ्यायचा ,कोरडा होऊ द्यायचा नाही ती लाटी कोरडी होते . हात अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचे नाही तर ते पीठ काळे होते. प्रत्येक ताटात दोन-दोन लाट्या द्यायच्या. सगळ्यांचे एक सारखे बारीक सुत झाले की ताटातून पुढे हातात घ्यायची प्रक्रिया असे. म्हणजे प्रत्येक ताटातील एक भूगोल म्हणजे गोळ्याचे झालेले बारीक सुत. प्रत्येक सुताचा एक पदर बोटात घेऊन मग दोन्ही हातांवर पदर  घ्यायचे व मग दुसर्‍या हातात. म्हणजे ज्याप्रमाणे आपण 'एवढी मोठी वस्तू' असा हात दाखवतो ना ? बस्स ! त्याप्रमाणे. एका हातावरून दुसऱ्या हातावर पदर घ्यायचे . पूर्ण ताटातले संपेपर्यंत हातावर गोळा करायचे ते एकमेकांना चिकटायला पण नको, मग तो हात हळूहळू लांब करायचा मोठा करता येईल तेवढा ! ह्याचे पिठ इतके मऊ लोण्यासारखे  असते  की फक्त हाताने बारीक बारीक करायचे. आपोआप लांब लांब दोऱ्या सारखे सुत होत जाते.  मग ते दोन भाग करून दोरीला बांधलेल्या एका कडेने काठीवर टाकायचे. अजून विशेष म्हणजे लग्नकार्यात रुखवंतात त्याची वेणी घालून त्याला रिबीन चे फुल बांधून ठेवत! साडी, खण, नारळ, सुद्धा करायचे. मग त्याला साडी बांधून झाकून ठेवायचे मग रात्रभर वाळले की दुसऱ्या दिवशी परत उन्हात वाळवायचे कारण बारा महिने टिकायला हवे ते. त्या ठेवायच्या कशा तर त्यावेळेस दारावरती डबे बादल्या तयार करणारे यायचे. त्यांना एक तेलाचा चौकोनी  तुपाचा मोठा  डबा देऊन एक पेटीचा आकार बनवून घ्यायचे म्हणजे डबा आडवा करून पेटी सारखा. त्याला कडी वगैरे सगळं बसवून मिळायचं. त्यात त्या व्यवस्थित बसत व वरून दुसऱ्या  डब्याच्या पत्र्याचे झाकण करायचे म्हणजे शेवया ठेवायला सोपे व्हायचे व न तुटता मावायच्या त्यात. 

ह्या बहुतेक रात्रीच्या जेवणात करायचे. नाहीतर ज्या दिवशी कमी भूक असेल, त्यादिवशी पोटभर  दूध शेवया करायच्या .
करण्याची पद्धत एका ताटात कच्च्या शेवया काढायच्या. शेगडीवर एका पातेल्यात अर्धे पातेले पाणी उकळत ठेवायचे. पाणी चांगले उकळले की त्यात शेवया टाकायच्या. मग झाकण ठेवून चांगली भरपूर वाफ आली की खाली उतरवायच्या व एका काडीच्या टोपलीत  गार करत ठेवायच्या. त्याला वेळून घेणे असे म्हणतात. मग त्यां  खोल ताटलीत घेऊन दूध , साखर, गुळ टाकून खायच्या. काय सांगू गरम गरम खूप छान लागतात !

त्याची दुसरी पद्धत म्हणजे तुपावर गुलाबी भाजून दूध आटवून त्याची खीर करतात आणि तिसरा प्रकार म्हणजे आंब्याच्या दिवसात आमरसा सोबत पण खातात. फोडणीच्या शेवया सुद्धा करतात. ज्याप्रमाणे पोहे किंवा उपमा करतात तशाच प्रकारे हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर घालून करायचे. खूप चटकदार, चविष्ट लागतात. शेवया करताना कंटाळा येऊ नये म्हणून गोष्टी , गाण्यांच्या भेंड्या असे हसत खेळत करायचे, कारण एकाचवेळी एकदम 2/3 किलोच्या करायचे. जवळ जवळ सगळी मिळून  सहा-सात तास लागायचे. लग्न वगैरे असेल त्यांच्या घरात त्यांना खूप जास्त प्रमाणात करावे लागायचे. तसेच रंगीत सुद्धा करायचे.  रुखवंतात ठेवण्यासाठी  तसेच नवरदेव  पारावर आला की जेवणासाठी ताट देत होते तेव्हा शेवया हमखास  लागायच्या. लग्न झाल्यावर नवरदेव नवरीला घास खाऊ घालण्यासाठी एक पद्धत असायची. त्यावेळी सुद्धा ह्या दूध शेवया पाहिजेच. सांजोरी चा पण मान असायचा. अशी ही गोष्ट  शेवयांसारखी लांबत जाते .

देशमुख ,लेवा पाटील या लोकांमध्ये पाटाच्या शेवया जास्त करतात . ते असे की एक लाकडी लांबट फळी सारखा पाट असतो - लांब दोन अडीच फुटाचा. त्यात पुढे नक्षी असते व मध्ये आडव्या रेषा असतात. पापडाच्या लाटण्याला असतात तशा. त्यात पण खूप मेहनत असते.  एका बाईने पाटावर पिठाचा गोळा घेऊन व हाताने घासून शेवयांचे सूत काढायचे आणि समोर बसून दुसऱ्या बाईने ते घेऊन खाटेवर  तुकडे करून टाकायचे. ही पण कलाकुसर असायची . त्यांना हात शेवयांसारखा  साग्रसंगीत पसारा लागत नाही.

अशा या शेवया लांबवल्या तितक्या लांबतात.
आता ह्या हळूहळू इतिहासजमा होत आहेत.

सुलहर 🖋️

Comments

  1. खुप खुप धन्यवाद आपण मनापासून वाचल्याबद्दल 👍🏻🌷

    ReplyDelete
  2. Mastach. Amhi patavarchya sevaya karaycho. Ti majjach geli g. Unhalyachya suttya laglya ki heech kam asachi. Papad, kurdaie, shevaya lonche. Saglya coloneet kakuna madat karayala jayacho. Ata kay te divas gelet. Sagle readymade aana ani kha. Junya athavani aayat saglya. Kaha gaye wo din.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"