गोष्ट एक बांगडीची

सुलहर सहर्ष सादर करीत आहे " विचार मंथन "

🌷"बांगडी"🌷

"अगं सुनबाई उद्या वडपूजा आहे नवीन बांगड्या भरून घे", तर सून म्हणते, "अहो सासुबाई  मला आज ऑफिस आहे आणि मी जीन्स घालणार त्यावर काय बांगडी घालणार का ? मी उद्या संध्याकाळी बघेन!". मग माझे मन भूतकाळात गेले आणि आठवले की आपण सासरी  होतो तेव्हा सक्तीने एका हातात कमीत कमी सहा बांगड्या तरी घातल्याच पाहिजे असा नियम होता. मग बांगडीवालीचा इतिहास आठवला. आमच्या गल्लीत बांगडीवाली यायची.  अजूनही तिचा आवाज आठवतो  व तिची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. नऊवारी पातळ, मोठे कुंकू व भारदस्त आवाज. डोक्यावर गोल मोठी टोपली,  त्यात पद्धतशीर रचून ठेवलेल्या बांगड्या. वेगवेगळे  कंगन, कडे, पाटली, इ. आमच्याकडे  जी यायची तिचे नाव पार्वती काकू होते. बांगड्या किती भरायच्या आहेत, कशाला लागणार आहेत, तिला सगळं माहीत असायचं, त्यामुळे ती आली की लगेच सिलेक्टेड बांगड्या दाखवायची . त्या किती पक्क्या आहेत हे दाखवण्याकरिता एका हातात दोन बांगड्या घेऊन आवाज करून  दाखवायची. जर बांगडी फुटकी असेल तर त्याचा आवाज वेगळाच यायचा. तर बांगडी फुटकी आहे की नाही हे चेक करण्याची पद्धत आहे ती.

कोणाचा हात जास्त कडक असतो त्या महिला ज्या दिवशी कुटण, दळण, कांडण, शेवया असे काम केले की हात मऊ होतो अशी समजूत होती म्हणून त्याच्या दुसऱ्या दिवशी बांगडीवालीला बोलवायच्या आणि  बांगड्या भरून घ्यायच्या. पूर्वी बांगडी फुटली तर खूप काही गुन्हा झाला असे समजायचे. काच आहे, ती तर फुटणारच ना? पण नाही! पूर्वी आम्ही त्या फुटलेल्या बांगडीच्या काचा गोळा करायचो व त्या दिव्यावर धरून वाकडी करायचो. अर्धगोल व एकात एक घालून एक माळ तयार करायचो. ते दाराला तोरण म्हणून लावायचो किंवा अजून काही शोपीस बनवायचो. लग्नात रुखवतात चुडा म्हणून एका कार्डबोर्ड ला नऊ बांगड्या  लावून त्यात मजकूर लिहायचो बांगड्यांचा . 

बांगडी हा विषय बांगडी सारखा खूप गोल गोल आहे. अगदी आपल्या जन्मल्या पासून तर शेवटपर्यंत . जन्मल्यानंतर पाचवी नंतर मुलगा असो की मुलगी दृष्ट लागू नये म्हणून बाळाच्या हातात काळी आणि पांढरी अशी बांगडी घालतात. मुलगी तीन वर्षांची झाली की आत्या तिला परकर-पोलके शिवते. ते घातले म्हणजे बांगड्या पाहिजे ! मग आपल्या जीवनात बांगड्यांचा प्रवास सुरू होतो. मग थोडा काळ गेल्यावर म्हणजे आम्ही मोठे झालो, कळायला लागल्यावर भुसावळला दारावरती जी बांगडीवाली यायची तिच्या कडून थोडे मनाप्रमाणे बांगडी घालायला मिळू लागली. त्यावेळेस दोन, तीन रुपये डझनाचा भाव होता. ऐंशी नव्वद मध्ये डाळिंबी रंगाची बांगडी  खूप प्रसिद्ध होती .आमची आई त्याच वापरायची. त्या जरा महाग असायच्या. एक डझनाची किंमत पंचवीस रुपये होती आता दीडशे - दोनशे रुपये झाली आहे. हातात जास्त बांगड्या असल्या की त्यांचा आवाज पण  खूप किण -किण असा मोहक येतो. त्याची प्रत्येकाच्या हाताची साईज असते 2-2 आणे गाळा 4-6  असा वाक्य प्रचार आहे . 

आता तर खूप फॅशनच्या येतात बांगड्या. लाखेच्या, खड्यांच्या, वर्कच्या अशा वेगवेगळ्या. त्या सुरक्षित ठेवण्यासाठी तर किती प्रकारचे बॉक्स, स्टॅन्ड, लाकडी ,काचेचे, कापडी, एक नाही अनेक प्रकारचे मिळतात. कारण त्यातली एकही बांगडी फुटली तर सेट खराब होतो आणि आपले मन पण बिघडते. खूप जपतो आपण त्यांना. किती कलेक्शन असते त्यांचे मुलींजवळ!

मग असतो लग्नातला चुडा! तो फक्त प्लेन हिरव्या रंगाचाच असतो. नवरीचा म्हणून त्याचे पैसे पण जास्त मोजावे लागतात. तो घातल्यावर किती सुंदर दिसतो नवरीचा हात!  आता नवरी करता प्लास्टिकच्या लाल रंगात मोठ मोठे सेट आपले नाव घालून तयार करून मिळतात. लग्नात सवाष्णींना, मानाच्या पाहुण्यांना बांगड्या भरण्याची पद्धत आहे. (कासरीन) बांगडीवाली  बाईला घरी बोलावून प्रत्येकाला बारा, सहा, ज्याच्या त्याच्या आवडी ने बांगड्या भरायच्या. लग्न आहे म्हणून हिरव्याच असायच्या . छोट्या मुली असतील तर त्या पण हौशीने भरायच्या. मुलगी  माहेरून जायची  तेव्हा तीच्या हातात नवीन बांगड्या दिसल्याच पाहिजे नाहीतर  सासरी लगेच टोमणा असायचा  "साध्या बांगड्या सुध्दा भरल्या नाही तुला ?" कोणी आपल्या कडे  मानाचे पाहुणे आले की  त्यांना एक ब्लाउज पीस व बांगड्या भरायला पैसे द्यायचे. तो मान असायचा. म्हणजे बांगडी किती वैभवशाली आहे बघा. महाराष्ट्रात तर तो एक सौभाग्याचा दागिनाच आहे. सोन्याच्या बांगड्या असल्या तरी त्यामध्ये एक काचेची बांगडी पाहिजे तरच त्या बांगड्या उठून दिसतात. बांगड्यांवरती भरपूर छान गाणे पण आहे "मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ " अशा प्रकारचे.

मुली ,महिला प्रत्येक सणवाराला आपल्या आपल्या आवडीने आणि हौशीने साडीवर, ड्रेसवर ,मॅचिंग बांगड्या घालतात. तसेच प्रत्येक जातीत  प्रत्येक गावात बांगड्या घालण्याची एक आगळी  वेगळी पद्धत आणि डिझाईन असते. युपी ,एमपी मध्ये  वेगळ्या असतात. राजस्थानी, मारवाडी, बंजारी, हैदराबाद, गुजराती सगळ्यांची वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. पूर्वी फक्त  काचेच्या बांगड्या वापरल्या जायच्या. विशेष म्हणजे त्यावेळी महिलांना बाहेर जाण्यास परवानगी नव्हती म्हणुन तिची एक मापाची बांगडी घ्यायची व बांगड्या आणून द्यायचे. त्यावेळेस रंग ठरलेले होते. लाल आणि हिरवा बस!!! एका हातात बारा-बारा घालायच्या. त्या पूर्ण फुटल्याशिवाय मध्ये कधीही नवीन बांगडी मिळत नसे. बांगड्या जरा फिट्ट भरायच्या म्हणजे फुटत नाही लवकर. सासू म्हणेल तेव्हाच आणि त्या फुटू नये म्हणून सावधगिरी बाळगावी लागायची. मनात भीती असायची . काम करताना जरा लक्ष देऊन करावे लागायचे. कपडे धुताना हमखास फुटायच्या मग त्याला पुढे काही कपडा गुंडाळून ठेवायचा म्हणजे त्या दगडावर लागून  फुटायला नको. 

पण गंमत पहा,  लहानपणापासून आपण लग्नापर्यंत काचेची बांगडी घालतो पण ज्या बाईचा नवरा नाही त्या बाईने काचेच्या बांगड्या घालायच्या नाही! असा जुन्या लोकांचा समज होता. आता तसे राहिले नाही. 

पूर्वी ह्या हातभर बांगड्या घालाव्या लागत. 'सौभाग्याचे लेणे' म्हणून त्या कधी बदलायच्या नाहीत काढायच्या नाहीत .पण त्यामुळे त्या महिलेला काय त्रास होत होता ते कोणाला दिसत नव्हते . त्या खूप घट्ट असल्यामुळे तेवढ्या भागात हवा लागत नव्हती. गर्मीत पूर्ण हात भर घामोळ्यांनी भरलेला असायचा. स्वयंपाक करताना,पोळी भाकरी करताना त्या सतत 1-2 तास चुलीजवळ असल्याने पोळ्या भाजताना  अक्षरशः त्याचे चटके लागायचे. पण कोण बघतो ? बोलायची सोय नाही कोणाला पर्वा नाही .आता फक्त फॅशन म्हणून वापरतात नाही वापरल्या तरी त्यांचे सोयरसुतक  कोणालाही नसते व कोणी बोलत पण नाही. नवी पिढी ना ! 

अशा या नाजूक बांगड्यांचा गोल इतिहास कसा वाटला सांगाल 😀

सुलहर 🖋️

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कर अष्टमी

"चहा"