मकर संक्रांत
सुलहर ' सहर्ष सादर करित आहे "विचारमंथन" -
🌹मकर संक्रांत🌹
काल झालेल्या मकर संक्रांत निमित्त सर्वांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला.👍🏻
जुने दिवस आठवले की आपल्या वेळेस पारंपारिक सण हे वेगळ्या पद्धतीने साजरा करायचे. आता मात्र सण असतो पण पहिल्या सारखी मजा वाटत नाही . त्याला काही कारण आहे. आज-काल मुली, सुनांच्या नोकरी मुळे आणि वेळेचे गणित यामुळे पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे पण असेल कदाचित. सण साजरा करतात पण वेगळ्या रीतीने. त्यांच्या आवडीने व सवडीने.
मकर संक्रांत हा सण वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण. माघ महिन्यामध्ये येतो. याची तारीख कधीही बदलत नाही. दरवर्षी 14 तारीख असते पण दर तीन वर्षानंतर 15 तारीख येते . मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात आणि या दिवसापासून तिळा तिळाने दिवस पण मोठा होत जातो . मकर संक्रांत ही विविध राज्यात
वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. उदा. महाराष्ट्रात मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरात मध्ये उत्तरायण ,हरियाणात ,हिमाचल प्रदेशात माघी, आसाम मध्ये भोगली (बिहू ह्या नावाने त्यांचे पारंपरिक नृत्य आहे) काश्मीर घाटीत, पश्चिम बंगाल मध्ये संक्रांत,पंजाब मधे लोहडी आणि उर्वरित राज्यांमध्ये मकर संक्रांती या नावाने साजरी केली जाते. दक्षिण भारतात अय्यप्पा ची पूजा खूप मोठ्या प्रमाणावर होते. गुजरात मध्ये तर पतंगाचा सण म्हणूनच ओळखला जातो. तिकडे त्यादिवशी प्रत्येक फॅमिली मध्ये पतंग उडवण्याची चढाओढ लागलेली असते. प्रत्येक रंगाची, प्रत्येक आकाराची आणि अगदी दहा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत पतंग असतात . पतंगीचा व मांजाचा खूप साठा आधीच खरेदी करून ठेवतात. खाण्यात नाश्त्या चे खूप प्रकार असतात. त्या दिवशी सकाळ पासून जे पतंग उडवायला सुरुवात होते ते अगदी रात्री पर्यंत. रात्री पतंगीला दिवे, फुगे वगैरे लावून सजवून मग उडवतात. त्या पतंगी आभाळात गेल्या की सर्व रंगाच्या पतंग एकत्र रंगीबेरंगी पतंगी डोलताना खूप छान दिसतात. तिकडे दिवाळी सारखा मोठा सण साजरा होतो. आता तसाच सण बरेच शहरात, गावो गावी होतो. पण तिकडली मजा काही औरच असते. खुप जण फक्त ते बघण्यासाठी खास तिकडे जातात. पाहुणे म्हणून तिकडे त्यादिवशी लहानापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण गच्चीवरच मुक्कामाला असतात. एक पतंग कटली की दुसरी तयार असते. पतंगीचा स्टॉक भरून ठेवतात .
अशाच प्रकारे आपल्याकडे तिळगुळाचे जास्त महत्त्व आहे. पूर्वी आमच्याकडे आई त्या दिवशी मुरमूर्याचे लाडू , डाळयांचे लाडू, तिळाच्या वड्या आणि तिळगुळ बनवायची. तो पण खलबत्यात कुटलेला असायचा तिळगुळ. वाह ! काय चविष्ट! आता मिक्सरमध्ये करतात. असो. छोट्या मुलांच्या हातून तिळगुळ सांडू नये म्हणून त्यांच्यासाठी खास हलवा विकत आणायचे. तिळगूळ देताना तो सर्वांना हातात द्यायचा आणि "तीळ गुळ घ्या गोड गोड बोला" असे बोलायचे.
संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी चा सण असतो. दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि त्या नंतर कर, असे तीन दिवस लागोपाठ चालायचे. भोगीच्या दिवशी सर्व मुली, महिला डोक्यावरून न्हात असत व आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून आंघोळ करत असत. कोणी उटणे जसे लावतो तसे तीळ वाटून ते लावून अंघोळ करतात . त्या दिवशी पूर्ण स्वयंपाकात तिळाचाच वापर करायचा. तिळाच्या पोळ्या पण करत. त्यादिवशी स्वयंपाक म्हणजे फोडणीची खिचडी, साधी खिचडी, बाजरीची खिचडी, काटेरी वांग्याची भाजी, वालाच्या शेंगा. कुणी कुणी मिक्स भाजी करतात . गुजरात मध्ये त्या भाजीला ओंदू म्हणतात. सुप्रसिद्ध आहे ती भाजी. या सर्वात तिळाचा वापर जरुरी आणि याला एक कारण म्हणजे थंडीचे दिवसात गर्मी मिळण्यासाठी हे पदार्थ आवर्जून खातात. त्या दिवशी मुलींना माहेरी बोलवायचे. आमच्याकडे आमच्या आत्या गावातच होत्या. सर्वांना आई जेवायला बोलवायची व त्यांना न्हाऊ माखु घालून मग संध्याकाळी काही साडी-चोळी देऊन माहेरपण साजरा करायची. आता ही प्रथा जवळ जवळ मोडली आहे. त्यादिवशी सकाळी मुलींनी आजू - बाजू - शेजारी खिचडी वाटायची प्रथा होती .ते म्हणजे देवाजवळ एक लाकडी पाट ठेवायचा त्यावर कापड ठेवायचे व मुलींनी त्याच्यावर डाळ आणि तांदूळ एकत्र करून अशी कोरडी खिचडी त्या पाटावर मांडायची. हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन द्यायचे व ते आपल्याला तिळगूळ देत. हे पूर्वी करायचे आम्ही लहान होतो तेव्हा.
त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत. हा संध्याकाळचा सामूहिक सण आहे. पहिल्या सारखी मजा नाही पण सण असतो. त्यादिवशी चार वाजेपासून तयारीला लागायच्या मुली. दारापुढे अंगणात रांगोळी काढायची, मग तिळगुळ भरण्यासाठी डबे शोधायचे आणि संध्याकाळी नवीन कपडे घालायचे. कुणी साडी, कुणी ड्रेस, कुणी फ्रॉक. यात काळा रंगाचा जास्त वापर होता आणि मग एकमेकींना मैत्रिणीला दाखवायची घाई ! सहा वाजता सगळ्यांनी ग्रुप ग्रुपने तिळगुळ वाटायला निघायचे. मोठ्या लोकांच्या पाया पडायच्या व तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलायचे. विद्यार्थी मुलांची टीचर कडे जास्त गर्दी असायची. आता तर दिसतच नाही मुलं बाहेर पडताना.
आम्ही सुद्धा सर्वांकडे जाऊन वाटायचो व दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये नेऊन सर्वांना तो द्यायचो. हा सण रथसप्तमीपर्यंत असतो. संक्रांति पासून रथसप्तमीपर्यंत त्यादिवशी सर्व सवाष्ण पाच सवाष्णींना सुगड्या चे वाण द्यायच्या. ते मातीचे असतात. त्यात ऊस, बोरं, हरभरे, तिळगुळ भरून सुपामध्ये कापडाने झाकून गव्हाची ओटी भरत.
त्या दिवसात घरोघरी हळदी कुंकवाचे प्रोग्राम होत असत. संक्रांतीला वस्तू ची लूट , वाण देणे अशी पद्धत आहे . प्रत्येक जण आप आपल्या ऐपतीप्रमाणे व आवडीने वस्तू ची लूट करतात. सामूहिक हळदी कुंकू पण करायचे त्यामध्ये पूर्वी एक मजेदार गेम असायचा - लकी ड्रॉ चा. (सोरट म्हणायचे) प्रत्येकाला आपल्या इच्छेने एक चिट्ठी घ्यायला लावायची. त्यात ज्याला जी वस्तू लागली ती वस्तू मिळायची. मजेशीर असायच तो गेम आणि गंमत म्हणजे ती वस्तू. आपल्याला आवडत असेल ती कधीच मिळत नसायची. अजून एक मुख्य म्हणजे ज्याचे नवीन लग्न झालेले आहे त्या मुलींची आणि सुनांची पहिली संक्रांत खूप मोठ्या प्रमाणात आणि हौशीने साजरी करत. काळ्या साडीचे त्या दिवशी महत्व असतं (काळ्या साडीला काळी चंद्रकला म्हणतात) त्या दिवशी हलव्याचे दागिने घालून जोडीने फोटो काढत . हे सर्वजण हौशीने करत. आता हलव्याचे दागिने ऑर्डरप्रमाणे विकत मिळतात. तसेच ज्यांच्या कडे लहान मुलगा ,मुलगी असेल त्यांचा पण संक्रातीचा सण मोठा साजरा होत. त्यांचे बोर न्हान करायचे .ते असे एका भांड्यात ऊस, गाजर , हरभरा , चॉकलेट , तिळगुळ , मुलांच्या आवडीचे खाऊ टाकून त्या लहान मुलाला पाटावर बसवून औक्षण करून ,काळा फ्रॉक, ड्रेस घालून डोक्यावरून शावर सारखे घालायचे. मग इतर लहान मुलं वेचून खात, फोटो काढत. मुलांना खूप मजा यायची.
तिसर्या दिवशी संक्रांतीची कर असते . त्या दिवशी आमच्याकडे डाळीच्या पिठाचे तिखट धिरडे आणि गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे असायचे. खूप चविष्ट आणि सुंदर लागतात .
असे आपले भारतीय सण. सर्वांना एकत्र आणणारे आणि आनंद लुटायला लावणारे. प्रत्येक सणाचे आपले महत्व आहे. त्याप्रमाणे ते पारंपारिक रित्या सर्वजण साजरा करतात.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्टकरा 😀👍🏻
Very nice. Amarnath Jangale
ReplyDelete🙏खूप खूप धन्यवाद 👍
ReplyDelete👌👌👍
ReplyDelete