आशीर्वाद
सहर्ष स्वागत करत आहे "विचार मंथन "
"आशिर्वाद"
आशिर्वाद हा निशुल्क, असून अमूल्य आहे. तो देताना किंवा घेताना पैसे द्यावे लागत नाही. मोठ्यांनी लहानांना दिलेला मनापासून एक अमूल्य ठेवाच आहे, खरेतर देवाचेच हे आशिर्वाद ,मोठे लोक माध्यम होऊन आपल्याला देतात. त्यांच्यात एवढी शक्ती आहे ती (अनाहत) दिसत नाही, पण पाठीशी उभी असते. हि ज्याच्या त्याच्या अनुभवाची आणि विश्वासाची गोष्ट आहे. आणि हे संस्कार सुद्धा आहेत जे आई वडील आपल्या मुलांना शिकवतात. त्यात शास्त्रीय कारण पण आहे की आपल्या मनात नम्रते चा भाव उत्पन्न होतो. म्हणूनच मोठे लोक जेव्हा भेटतात तेव्हा आपण त्यांना वाकून नमस्कार करतो.
याच्या वरून एक गोष्ट आठवली, एका गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत होते, आई वडील व त्यांचा एक मुलगा गणू. ते खूप कष्ट करून पैसा मिळवत होते. चरितार्थ चालवत होते. एक दिवशी वडील अचानक आजारी पडले. डॉक्टर ईलाज बराच झाला. जवळ होते नव्हते ती जमा पुंजी खर्च झाली. आजार काही बरा झाला नाही. त्यांना बायको व मुलाची खूप काळजी वाटू लागली की आपल्या मागे कसे होणार ? तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलावले व डोक्यावरून हात फिरवून म्हणाले, "बेटा गणू मी तुझ्या साठी (ईस्टेट) पैसा-अडका ठेवला नाही. होते नव्हते ते सर्व खर्च झाले खूप वाईट वाटते . पण तुला एक आशिर्वाद देतो की तू जिथे जाशील तिथे तुझे काम होईल , ज्या मातीत हात घालशिल त्याचे सोने च होईल !". वडील शांत झाले. गणूला त्यावेळी थोडे दुःख झाले, तो मनातून नाराज झाला. त्याला त्याच्या आईने समजावले "बेटा, आशीर्वादच महत्त्वाचा आहे तू कष्ट कर तुला यश जरुर मिळेल". दिवसा मागून दिवस गेले. मुलगा मोठा झाला. एक हातगाडी घेतली, बाहेर पडला, भाजी विकू लागला, हळू हळू व्यवसाय वाढला. दुकान घेतले, पुढे मसालाचा व्यापारी झाला. गावातले लोक म्हणायचे गणू तुझ्या बापाने काय केले नाही , पण तू छान मेहनत करतोय तर तो म्हणायचा मी काहीच करत नाही, हे सर्व माझ्या वडिलांच्या आशिर्वादामुळेच होत आहे. प्रत्येकाला हेच सांगायचा. पण त्याचे मित्र त्याला चिडवायचे , म्हणायचे बापाचा आशिर्वाद आहे तर कशाला कष्ट करतो,त्याला राग यायचा. पण त्याने कधीच राग केला नाही. एका मित्राने त्याला डिवचले, "एवढे आहे तर बाहेर जाऊन व्यापार कर. बापाचा आशिर्वाद आहे ना?" त्याने मनाशी काही ठरवून मित्रांशी पैज लावली की मी परदेशात मसाल्याचा व्यापार करूनच दाखविन. सारे मसाले घेतले व व्यापार करायला म्हणून परदेशात गेला. त्यावेळी बोटीचा प्रवास होता. समुद्र किनाऱ्यावर उतरल्यावर सामान उतरवले व पुढे कसे जायचे याची चौकशी करण्यासाठी विचारपूस करू लागला.
थोडं पुढे गेला तर त्याला एक दृश्य दिसले काही पुरुष मंडळी हातात चाळणी घेऊन वाळू चाळत होते, काही लोक उभे होते, आणि एक व्यक्ती त्यांना सूचना देत होता. त्याने एका माणसाला विचारले इथे कसली गर्दी आहे? त्याने सांगितले आम्ही शिपाई आहोत. हा आमचा प्रधान मंत्री आहे. काल इथे राजाची अंगठी वाळूत पडल्यामुळे हरवली ती दिसत नाही. म्हणून प्रत्येक जण थोडी थोडी वाळू चाळुन बघत आहे, पण अजून अंगठी मिळाली नाही.
त्याने मनात विचार केला राजाजवळ तर किती अंगठ्या असतील एक हरवली तर एवढे अस्वस्थ का ? तेवढ्यात प्रधानाची व गणूची नजरा नजर झाली, प्रधानाने त्याला विचारले आपण कोण आहात ? गणूने त्यांना नमस्कार केला व सांगितले मी एक व्यापारी आहे, इथे व्यापार करावा या हेतूने आत्ताच आलो आहे. इथे गर्दी दिसली म्हणून विचारपूस केली, तर राजाची अंगठी हरवल्याचे समजले. "अरे हो बाबा , राजाला ती एका फकिराने आशिर्वाद म्हणून दिलेली एक अमूल्य भेट होती." मग तो व्यापाराविषयी बराच वेळ बोलत बसला, बोलता बोलता त्याला आशीर्वाद हा शब्द ऐकून त्याला वडिलांची आठवण झाली . मग त्याने प्रधानाला सांगितले की प्रधानजी माझा पण ह्यावर खूप विश्वास आहे. कारण मला पण माझ्या वडिलांनी असा आशिर्वाद दिला आहे. जे काम हातात घेतले ते काम कष्टाने आणि विश्वासाने केले तर त्याचे सोनेच होईल. मग ते माती का असेना, आणि सहज म्हणून खाली वाकून त्याने वाळू हातात घेऊन उचलली ,पाहतो तर काय त्याच्या हातात एक खडा आला होता. बघतो तर काय! एक लखलखीत खड्याची अंगठी होती! ते बघून तो म्हणाला, ही तर नाही तुमची अंगठी? सर्वजण बघून एकदम चकित झाले व प्रधानाने आनंदाने गणूला मिठीच मारली व म्हणाला राजाची मौल्यवान वस्तू तू मिळवून दिली! तू मागशील ते बक्षीस देईल राजा तुला. आम्ही दोन दिवसापासून शोधत आहोत. ही वार्ता राजाला जाऊन सांगितली . राजाने प्रधानाला सांगितले त्या व्यापाराला माझ्याकडे घेऊन या. राजा बोलला तुला काय बक्षिस पाहिजे? गणू म्हणाला मला काहीच नको तुम्ही मला फक्त आशिर्वाद द्या. मी व्यापार करायला आलो आहे. राजा म्हणाला, अरे ती नुसती अंगठी नसून मला एका फकिराने दिलेला एक आशिर्वाद, म्हणून मौल्यवान वस्तू होती आणि मला आता खूप खूप आनंद झालेला आहे . गणू म्हणाला माझा फक्त व्यापार व्हावा हीच एक इच्छा आहे. राजा म्हणाला ठीक आहे, मग त्यांनी प्रधानाला सांगून गणूने जे विकायला आणले आहे ते सर्व घेतले व त्याचा मोबदला म्हणून त्याला सुवर्णमुद्रा दिली. गणूला खूप आनंद झाला व वडिलांच्या आशिर्वादाची खरी किंमत कळाली. आणि राजाला त्याची लाख-मोलाची वस्तू गवसली.
यालाच म्हणतात दैवी चमत्कार ,आणि वडिलांचा मिळालेला आशिर्वाद. खोटा कसा ठरेल बरं !? अशी असते आशिर्वादाची ताकत. म्हणून म्हणतात आशिर्वाद फुकाचा असतो पण लाखाचा .
महाभारतात पण असा एक प्रसंग आला होता, एकदा व्यथित होऊन भीष्मपितामहा घोषित करतात की, मी उद्या सर्व पांडवांचा नाश करेन. तेव्हा पांडवांची अस्वस्थता वाढते, कारण भीष्मांच्या क्षमतेची सर्वांना कल्पना असते. श्रीकृष्णाला पांडवांची अवस्था लक्षात येताच ते द्रौपदीला सोबत घेऊन पितामहाच्या कक्षात पोहोचतात. रात्रीची वेळ असल्याने स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणातात की आत जाऊन पितामहा ना प्रणाम कर, द्रोपदी भिष्मांना साष्टांग नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव असा आशिर्वाद ते तिला देतात. शिबिरात परततांना श्री कृष्ण द्रौपदीला म्हणतात की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन नमस्कार केल्यामुळे तुझ्या पतींना जीवदान मिळाले! हे तुझ्या लक्षात आले का ?
अशी असते नमस्कार आणि आशिर्वादाची शक्ती .
सुलहर
खूपच छान आशिर्वाद👍.
ReplyDeleteधन्यवाद👍
Deleteआपण कोण?
प्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन .खूप साध्या, सोप्या भाषेत लिहिले आहे. असेच तुमचे पुढील लिखाण वाचायला नक्की आवडेल.
ReplyDeleteरेखा खोले
ReplyDeleteधन्यवाद,
Deleteतुमच्या सदैव अशाच शुभेच्छा असाव्या👍
खुप छान लेख आणि गोष्टींचा दाखला पण समर्पक. 🙂
ReplyDeleteधन्यवाद 👍🌝
ReplyDeleteमुग्धा